बारामतीच्या न्यायालयात पोलिस आणि वकिलांमध्ये तुंबळ हाणामारी, उपाधीक्षक नारायण शिरगावकर यांना देखील मारहाण ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या गुन्ह्यात एका वकीलासह काहीजणांना ताब्यात घेऊन न्यायालयात नेल्यानंतर तेथे जमलेल्या 100 ते 125 वकिलांनी पोलिसांना अश्लील शिवीगाळ केली. यानंतर झालेल्या वाढतात तुंबळ हाणामारी झाली. यावेळी पोलिसांनी शेवटी लाठीचार्ज केल्याने गोंधळ निवळला. पोलीस उपाधीक्षक नारायण शिरगावकर यांना देखील मारहाण झाल्याचे सांगण्यात आले आहे.

बारामती शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात एका वकिलाचे देखील नाव आहे. त्यामुळे बारामती पोलिसांनी वकील आणि यातील आणखी आरोपींना अटककरून आज दुपारी न्यायालयात नेले. यावेळी एक अधिकारी आणि 6 कर्मचारी होते. न्यायालयात आधीच 100 ते 125 वकील जमले होते. त्यांनी पोलीस येताच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच पोलिसांना शिवीगाळ सुरू केली. यामुळे चांगलाच गोंधळ झाला. पोलीस येथून दुसऱ्या ठिकाणी निघाले असता वकील त्यांच्यामागे जाऊन पुन्हा गोंधळ घालत शिवीगाळ करू लागले. यामुळे एका कर्मचाऱ्याने मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग घेण्यास सुरुवात केली. यातून धकाबुक्कीचा प्रकार घडला.

परिस्थिती हाताच्या बाहेर जात असल्याने बारामती विभागाचे उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांना बोलविण्यात आले. ते आल्यानंतर आणखीनच गोंधळ उडाला. यातून वकिलांनी मारहाण करण्यास सुरुवात झाली. अचानक गोंधळ वाढल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती गंभीर झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. आणखी पोलिसांची मदत घेण्यात आली.

दरम्यान यानंतर पोलिसांनी काही वकिलांना ताब्यात घेतले आहे. अद्याप त्यांच्यावर काय कारवाई झाली हे समजले नाही. मात्र या प्रकारानंतर वकील संघटना प्रचंड आक्रमक झाल्या आहेत. तसेच पोलीस कायद्याचा गैरवापर करत असल्याचा आरोप देखील केला आहे.