पिंपरीत 2 गटामध्ये लोखंडी रॉ़ड, दांडक्याने तुफान हाणामारी; 7 जणांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन –  दोन गटात झालेल्या वादातून लोखंडी रॉड, दांडके, फायटरने तुफान हाणामारी झाली. नेहरूनगर, पिंपरी येथे सोमवारी (दि.29) रात्री ही घटना घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करून दोन्ही गटातील 7 जणांना अटक केली आहे.

पहिल्या प्रकरणात अनिकेत अनिल जाधव (वय 19 रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विशाल रणखांबे, आकाश रणखांबे, संजय कांबळे, दीपक जावळे, इश्वर कांबळे, अजय लोंढे (सर्व रा. विठ्ठलनगर, पिंपरी) यांना अटक केली आहे. तर बाळा कांबळे आणि बाळा जावळे (दोन्ही रा. ‍विठ्ठलनगर, पिंपरी) यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्याचा मित्र रोहित शिंदे हे बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये दारू पित होते. त्यावेळी फिर्यादीला जिवे मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी लोखंडी रॉड तसेच लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे.

दुसऱ्या प्रकरणात आकाश युवराज रणखांबे (वय 26 , रा. विठ्ठलनगर, पिंपरी) याने मंगळवारी (दि. 30) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिकेत अनिल जाधव, सुशांत अनिल जाधव, रोहित शिंदे, टॉकनचा भाऊ (सर्व रा. विठ्ठलनगर, पिंपरी), आतुल डोंगरे (रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) व त्यांचे साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी रोहित शिंदे याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचे चुलते विष्णू मुंजाजी रणखांबे यांच्या घरी जेवण करण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपी अनिकेत जाधव व रोहित शिंदे यांनी फिर्यादीला लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.