ऊस दराच्या आंदोलनाला ‘हिंसक’ वळण, ‘ट्रॅक्टर’ पेटवला

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापुरातील शिरोळ आणि हातकंणगले तालुक्यात ऊस दराचे आंदोलन चिघळले असून त्याला हिंसक वळण लागले आहे. कर्नाटकामधील कारखान्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ऊस आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.

दानोळी इथे अथनी शुगर्स कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर पेटवला असून ६ ट्रॅक्टरमधील हवा सोडून ऊस वाहतूक रोखण्यात आली. तसेच हातकंणगलेमधील आळते इथे व्यंकटेश्वरा कारखान्याच्या दोन ट्रॅक्टरची हवा सोडून ऊस वाहतूक रोखण्यात आली आहे. हमी भाव जाहीर न करता ऊसतोड सुरु झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरु केले आहे. कारखानदारांनी अगोदर एफआरपी दर जाहीर करावा व तो एकरकमी द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

मात्र, कर्नाटकातील कारखान्यांनी एफआरपी जाहीर न करताच ऊसतोड सुरु केल्याने हे आंदोलन पेटले आहे. गेल्या १८ वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जयसिंगपूर येथे ऊस परिषद घेतली जाते. या परिषदेत किती दर हवा हे ठरविले जाते. तेथेच आंदोलनाची दिशा ठरते. त्यानंतर ऊस तोड रोखून कारखाने बंद पाडले जातात. उग्र आंदोलनातून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. त्यानंतर शासनामार्फत सहकार अथवा इतर खात्याचे मंत्री मध्यस्थी करतात. दोन तीन बैठकांनंतर सर्वमान्य तोडगा काढला जातो. अशी गेल्या काही वर्षापासून प्रथा पडली आहे. मात्र, यंदा राष्ट्रपती राजवट लागू असल्याने ऊस दराचा प्रश्न थेट राज्यपालांच्या कोर्टात जाणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद येत्या शनिवारी २३ नोव्हेंबरला जयसिंगपूर येथे होणार आहे. कोल्हापूराच्या महापूरात जिल्ह्यातील ऊसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. येत्या १ डिसेंबरपासून जिल्ह्यातील कारखाने सुरु होणार आहे. त्यादृष्टीने या ऊस परिषदेकडे शेतकरी आणि साखर कारखानदार या सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Visit : Policenama.com