‘त्या’ लाचखोर पोलिसाला जिल्हा रुग्णालयात ‘व्हीआयपी (VIP) ट्रिटमेंट’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – लाच प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर जिल्हा रुग्णालयात ‘व्हीआयपी ट्रिटमेंट’ सुरू आहे. आरोपींसाठी स्वतंत्र कोठडी उपलब्ध असताना हा पोलीस बाहेरच्या बेडवर उपचार घेत आहे. त्यामुळे पोलीस व सामान्य यांच्यासाठी वेगळा कायदा आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

न्यायालयातील पेन ड्राइव्ह चोरी प्रकरणात अटक करताना जप्त केलेला मोबाइल, दुचाकी परत करण्यासाठी वकिलाकडून १० हजारांची लाच घेताना शिवाजीनगर ठाण्यातील पोलीस कर्मचारी शंकर राठोड यास जालना एसीबी पथकाने शनिवारी पकडले होते. तो न्यायालयीन कोठडीत होता. दरम्यान, त्याची रवागनी जिल्हा कारागृहात झाली. मात्र, प्रकृती अस्वास्थावरून रविवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात कोठडीतील आरोपींसाठी वॉर्ड क्र.६ मध्ये स्वतंत्र कक्ष आहे. मात्र, तो कोठडीबाहेरील बेडवर त्याच्यावर उपचार केले जात असून, त्याच्याभोवती नातेवाइकांचा गराडा आढळून आला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत असून पोलीस असल्याने त्याची सरबराई सुरू होती, अशी चर्चा जिल्हा रुग्णालय परिसरात ऐकावयास मिळाली.