‘मणी माऊ’ला वाचविण्यासाठी आजीनं नातवालाच लटकवलं 5 व्या मजल्यावर (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर दररोज नवनवीन थक्क करून सोडणारी व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वृध्द महिला आपल्या सात वर्षांच्या नातवाला दोरीनं इमारतीच्या पाचव्या मजल्यावर लटकवताना दिसत आहे. मुख्य म्हणजे हा सगळा खटाटोप या महिलेनं एका पाळीव मांजरीला वाचवण्यासाठी केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ चीनमधला असल्याचे समोर आला आहे. इमारतीच्या खाली उभ्या असलेल्या काही लोकांनी हा व्हिडीओ शूट केला आहे. त्यानंतर शूट केलेला व्हिडीओ हा सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये एक मांजर इमारतीच्या दोन्ही फ्लोअरच्या मध्ये अडकली आहे. त्यामुळे एक महिला त्या मांजरीला वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. जेव्हा कुठला मार्ग दिसत नव्हता तेव्हा या महिलेने चक्क आपल्या नातवाला खाली उतरवले. खाली उभ्या असलेल्या लोकांनी या महिलेस सावधानतेचा इशारा ही दिला होता.

स्थानिक मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, मांजरीला वाचवण्यासाठी जवळपास १० मिनिटे सर्व जण प्रयत्न करत होते. त्यामुळं १० मिनिटे मांजर आणि मुलगा हवेत लटकत होते. ही घटना सिचुआन प्रांताच्या पेंगटन काउंटी येथील आहे. या व्हिडीओ बघून सर्वच लोकांनी त्या महिलेस ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. कारण मांजरीला वाचवण्यासाठी तिने आपल्या नातवाचा जीव धोक्यात टाकला होता.

एका वृत्तवाहिनीने मुलाला विचारले असता तो मुलगा म्हणाला की, “मी खूप घाबरलो होतो, व्हिडिओ पाहिल्यावर आजीसुद्धा घाबरली होती”. तर, या महिलेने, “आता पुढे कधीच असे करणार नाही. परंतु त्या क्षणाला मांजरीचा जीव वाचवण्याची चिंता होती त्यामुळे मोठ्या धैर्याने हा निर्णय घेतला होता”, असे महिलेनं सांगितले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी व्हिडीओ शूट करणाऱ्यांना ही धारेवर धरले आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/