महापूरानंतर आता साथीच्या आजारांचं थैमान, १२ हजार जणांना ताप आणि जुलाबाचा त्रास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापूर, सांगलीकरांची पुरामुळे मोठी हानी झाली आहे. पूर ओसरल्यानंतर आता साथीच्या आजारांनाही सुरुवात झाली आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत तसेच ९ हजार पूरग्रस्त ताप तर ३ हजार रुग्णांना जुलाबाची लागण झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

दीपक म्हैसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार , ‘राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्या सर्वेक्षणामध्ये त्यांना होत असलेल्या आजाराची तपासणी करून त्याचे निदान केले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांमध्ये सध्या आरोग्य विभागाचे ३२६ तर सांगली जिल्ह्यात १३४ वैद्यकीय पथके कार्यरत आहेत.

आरोग्य विभागाकडून साथरोग सर्वेक्षण करण्यात येत असून पाणी शुद्धिकरणासाठी क्लोरिन गोळ्यांचे वाटप केले जात आहे. कीटकनाशक औषधाची धूर फवारणी करण्यात येत आहे. या दोन्ही जिल्ह्यांत लेप्टोस्पायरोसिसचा आजार होण्याची शक्यता गृहीत धरून नागरिकांना प्रतिबंधक डॉक्सिसायक्लिन हे औषध देण्यात आले आहे. दोन्ही जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आल्याने अनेक नागरिक त्यांच्या घरी परतले आहेत. मदत छावण्यांमधील नागरिकांची संख्या घटली आहे.’

राज्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने काही भागात पूरस्थिती उद्भवली. राज्यातील पूर ओसरला असला तरीही संसर्गजन्य आजार मात्र झपाट्याने वाढू लागले आहेत.

Loading...
You might also like