TikTok Star सिया कक्कडला मिळत होत्या धमक्या ! कॉल डिटेल्समुळं समोर येऊ शकतं मृत्यूचं गूढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांतसिंग राजपूतनंतर टिकटॉक स्टार सिया कक्कडने आत्महत्या सारखे पाऊल का उचलले, हा चर्चेचा विषय बनला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अद्याप कोणताही पुरावा हाती लागलेला नाही. सियाच्या आत्महत्येबद्दल पोलिस सतत नातेवाईक, ओळखीचे लोक आणि शाळकरी मित्रांची चौकशी करत आहेत. पोलिसांनी सियाच्या मॅनेजरकडेही चौकशी केली आहे. सिया आपल्या कुटुंबासह पूर्व दिल्लीतील गीता कॉलनीमध्ये राहत होती. रिपोर्ट्सनुसार, सियाला दररोज डान्सचे व्हिडिओ शेअर करण्याबाबत सोशल मीडियावर धमक्या मिळत होत्या, यामुळे सिया खूप त्रस्त होती.

पोलिसांनी सिया कक्कडचा मोबाइल जप्त केला आहे. पोलिस आता फोन कॉल डिटेल मिळवण्याच्या तयारीत आहेत, जेणेकरून शेवटच्या वेळी तिचे कोणाशी बोलणे झाले याची माहिती मिळू शकेल. तसेच पोलिसांनी तिच्या खोलीतून लॅपटॉप व काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.

सिया कक्कडच्या आत्महत्येबाबत कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, बुधवारी रात्री तिला जेवण्यासाठी बोलावले असता खोली आतून बंद होती. बराच वेळ प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा दरवाजा तोडण्यात आला. दरवाजा तोडला तेव्हा ती पंख्याला लटकलेली होती. कुटुंबीयांनी तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

तर सियाच्या मॅनेजरचे म्हणणे आहे की, बुधवारी तिने शेवटचा व्हिडिओ टिकटॉकवर टाकला होता. यासोबतच एका गाण्याबद्दलही त्यांची चर्चा झाली होती, पण त्यावेळी ती कोणत्याही प्रकारच्या अडचणीत किंवा तणावात दिसली नव्हती. पोलिसांनाही कोणत्या तणावाबाबत कुटुंबियांनी नाकारले आहे.