काय सांगता ! होय, बिबट्यानं झाडाच्या शेंड्यावरच केली माकडाची ‘शिकार’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – जंगलामध्ये जिवंत राहण्यासाठी पशु-पक्ष्यांना रोज मृत्यूशी झुंज द्यावी लागते. तर कधी या जंगली प्राण्यांच्या थक्क करणार्‍या कसरती आश्चर्यचकित करतात. कधीतरी जंगलामधील हा थरार कॅमेरामध्ये रेकॉर्ड होतो आणि त्याची चर्चा होते. असाच एक व्हिडिओ सध्या ट्विटवर चर्चेचा विषय ठरत आहे .

सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक बिबट्या झाडावर चढून माकडाची शिकार करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये बिबट्याने झाडाच्या एका फांदीवरुन दुसर्‍या फांदीवर उड्या मारणार्‍या माकडाला पकडण्यासाठी चक्क बॅक फ्लिप म्हणजेच उलटी उडी मारली आहे. सुशांत नंदा या आयएफएस अधिकार्‍याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना, शिकार पकडण्यासाठी बिबट्याने भन्नाट बॅक फ्लिप उडी मारली. ही उडी अगदी जगावेगळीच होती. सामान्यपणे झाडावर शिकार करताना बिबटे त्यांची शिकार जमीनीच्या दिशेने खाली खाली घेऊन येतात आणि मग झडप टाकून मानेचा चावा घेत शिकार करतात. मात्र इथे माकडाची शिकार करण्यासाठी बिबट्याने झाडावर असतानाच उडी घेत माकडावर हल्ला केला आहे.