अमानुष ! मांजरीच्या पिल्लाला जिवंत जाळले, माहिती देणार्‍यांना 50 हजारांचे बक्षीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मांजरीच्या पिल्लाला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राण्यांच्या सुरक्षेसाठी काम करणार्‍या ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल एनजीओने या अमानुष प्रकाराची गंभीर दखल घेतली असून निर्घृण कृत्य करणार्‍यांबाबत माहिती देणार्‍यांना 50 हजार रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे.

रात्रीच्या अंधारात एका मांजरीच्या पिल्लाला लाइटरने जाळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेतात किंवा गवतावर बसलेले हे पिल्लू आग लागल्यानंतर सैरावैरा पळत सुटले होते. त्यानंतर काही क्षणांमध्येच तडफडत अखेरचा श्वास घेताना या व्हिडिओत दिूसन आले आहे. व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि कुठे ही घटना घडली याबाबतची माहिती मिळालेली नाही. पण, हा व्हिडिओ एका ट्विटर युजरने एचएसआयच्या निदर्शनास आणून कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर एचएसआयने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. एका लहान, असहाय्य मांजरीच्या पिल्लाला जिवंत पेटवण्यात आले.

असे कृत्य करणारा व्यक्ती इथेच थांबणार नाही. त्याने आधी किती प्राण्यांसोबत असे कृत्य केले आहे, याची माहिती काढून त्याच्यावर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. याबाबतची तक्रार आम्ही केली असून लवकरच तपासाला सुरूवात होईल. जर तुमच्याकडे या घटनेबाबत काहीही माहिती असेल तर 91 7674922044 या नंबरवर कॉल करुन देऊ शकतात, असे आवाहन ह्युमन सोसायटी इंटरनॅशनलचे भारतातील मॅनेजिंग डायरेक्टर आलोकपर्णा सेनगुप्ता यांनी केले आहे.