धक्कादायक ! अमेरिकेत आले आगीचे वादळ

पोलिसनामा ऑनलाईन – अमेरिकेमध्ये आणखीन एक नैसर्गिक संकट आले असून कॅलिफोर्नियामधील जंगलांमध्ये वणवा पसरला आहे. जंगलामध्ये भीषण आग लागलेली असतानाच वादळ आल्याने फायर टॉरनॅडो दिसले आहे. वादळ कॅमेरामध्ये कैद झाले आहे. आगीच्या पिवळ्या रंगाच्या ज्वालांमुळे वादळ हे आगीचे वादळ असल्याचा भास होतो त्यामुळेच वणवा लागलेल्या ठिकाणी येणार्‍या वादळांचा फायर टॉरनॅडो व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

कॅलिफोर्नियातील लॉयल्टन परिसरामधील जंगलांना परिसरामध्ये वादळाचा इशारा देण्यात आला होता. या वादळामध्ये आग पसरवण्याची क्षमता असल्याचेही सांगण्यात आले होते. आगीतील उष्णता आणि धूर वादळामध्ये खेचले जातात. आग, धूर आणि वादळ या तिघांपासून पिवळ्या रंगाचे फायर टोर्नेडो तयार होते. या वादळाचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर आता 2020 मध्ये केवळ परग्रहावसीय पहायचे राहिलेत अशा कमेंट अनेकांनी केल्या आहेत. वरिष्ठ हवामान तज्ज्ञ डॉन जॉनसन यांनी अशा वादळांना फायरनेडो असेही म्हणतात अशी माहिती दिली. अगदी विचित्र हवामानामध्ये अशाप्रकारच्या वादळाची निर्मिती होते. वादळाच्या मार्गात येणारी प्रत्येक वस्तू खाक होते. या वादळाची नुकसान पोहचवण्याची क्षमता ही साध्या वादळापेक्षा अधिक असते, असेही ते म्हणाले. आतापर्यंत या आगीमुळे 20 हजार एकर जंगल नष्ट झाले आहे. फायर टॉरनॅडोमुळे अधिक प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.