शेतकर्‍याने चोरांसाठी लावला CCTV कॅमेरा, घडले मात्र भलतेच..

आंबेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – शेतातल्या डाळींब पिकाचे नुकसान झाले म्हणून एका शेतकर्‍यांने घराभोवती आणि डाळींब बागेसभोवती सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. कॅमेरे बसविल्यानंतर पहिल्याच दिवशी चोरट्यांऐवजी सीसीटीव्हीत बिबट्याच पाहायला मिळाल्याची घटना घडली आहे. आंबेगाव तालुक्यातील लौकी गावातील दरेकरवस्तीवर ही घटना घडली आहे.

बिबट्याने राजेंद्र रामदास वाळूंज यांच्या गाईच्या गोठ्यात शिरकाव करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला आहे. दरेकरवस्ती येथे राजेंद्र वाळूंज यांच्या घराशेजारीच पाच गाई आणि एक वासरू असा सात जनावरांचा गोठा आहे. शेजारी 35 एकर डाळिंबाची बागही घरासमोरच आहे. चोरांच्या उपद्रवामुळे गेल्या वर्षी त्यांचे डाळींब पिकाचे नुकसान झाले होते. त्यामुळे या वर्षी त्यांनी घराभोवती व डाळींब बागेसभोवती सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.कॅमेरे बसविल्यानंतर पहिल्याच दिवशी चोरट्यांऐवजी त्यांना सीसीटीव्हीत बिबट्याच पाहायला मिळाला. बिबट्या व गाईचा थरारही सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. बिबट्याने दहा कोंबड्या फस्त केल्या आहेत. मात्र, गाईंनी आक्रमकता दाखवल्याने बिबट्याची भंबेरी उडाली आणि गोठ्यातील 5 गाई बचावल्या आहेत.