Video : राहुल गांधींचे इंग्रजी भाषांतरकाराला कळेना, भर सभेत झाली फजिती

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांनी प्रचाराचा सपाटा लावला आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये मात्र प्रचारासाठी देशातील इतर भागातून येणाऱ्या नेत्यांना भाषांतरकाराला (ट्रान्सलेटर) घेऊन भाषण करावे लागते. अनेकवेळा ट्रान्सलेटरला उमेदवार काय बोलतोय हे न कळाल्याने भरसभेत फजिती होते. असाच प्रकार राहुल गांधी यांच्या बाबतीत घडला आहे.

मंगळवारी राहुल गांधी प्रचारासाठी केरळमध्ये गेले होते. येथे एका रॅलीमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर विविध मुद्यांद्वारे हल्ला चढवला. राहुल गांधी यांचे भाषण भाषांतरीत करून स्थानिकांना समजेल अशा भाषेत सांगण्याची जबाबदारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.जे. कुरियन यांच्यावर होती. मात्र, राहुल गांधी यांची इंग्रजी न समजल्याने भर सभेत त्यांची फजिती झाली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी ट्रोल करत काँग्रेसची फिरकी घेतली आहे.

सभेत काय झालं?
राहुल गांधी येथे इंग्रजीमध्ये भाषण देत होते. काँग्रेस नेते पी.जे. कुरियन ते स्थानिक भाषेत भाषांतरीत करून सांगत होते. राहुल गांधींनी इंग्रजीमध्ये मोदींच्या ‘चौकीदार’ कॅम्पेनवर टीका केली, परंतु कुरियन यांना काही कळालं नाही. ते राहुल गांधींच्या तोंडाकडे पाहात बसले, हे पाहून राहुल गांधीही आपले हसू रोखू शकले नाहीत. त्यानंतर राहुल गांधींनी त्यांच्या कानात आपल्या वक्तव्याचा अर्थ सांगितला. असा प्रकार अनेकवेळा झाल्याने नेटकऱ्यांनी याचा व्हिडीओ शेअऱ करत काँग्रेसला ट्रोल केले आहे.