‘या’ एका फोटोने खराब केले बरेच Android स्मार्टफोन, आता फोटोग्राफरकडून समजलं ‘हे’ मोठं कारण

पोलीसनामा ऑनलाईन : काही दिवसांपूर्वी बर्‍याच अँड्रॉईड वापरकर्त्यांनी एका फोटोबद्दल तक्रार केली होती की, त्याला वॉलपेपरप्रमाणे लावल्यानंतर फोन क्रॅश होत आहे. फोटोत एक निसर्गरम्य दृश्य होते, ज्यात डोंगर, नद्या, ढग दिसत आहे. परंतु या फोटोमुळे फोन का खराब होत आहेत हे कोणालाही समजले नाही. परंतु आता ज्याने हा फोटो क्लिक केला आहे त्याने स्वत: याचा खुलासा केला आहे. माहितीनुसार हा फोटो वॉलपेपर म्हणून सेट केल्यावर फोन आपोआप पुन्हा चालू आणि बंद होतो. याचा परिणाम गुगल पिक्सल आणि सॅमसंग फोनवरही झाला आहे.

हा फोटो व्हायरल झाल्यावर सॅन डिएगो येथील वैज्ञानिक आणि छायाचित्रकार गौरव अग्रवाल यांनी सांगितले की, हा फोटो 2019 मध्ये मोन्टाना येथील ग्लेशियर नॅशनल पार्क येथील सेंट मेरी लेक येथे घेण्यात आला होता, जेथे तो आपल्या पत्नीसह गेला होता. अग्रवाल यांनी सांगितले की, त्याने हा फोटो आपल्या निकॉन कॅमेर्‍याने क्लिक केला आहे. घरी आल्यानंतर त्याने लाइटरूमवर फोटो एडिट करुन फ्लिकरवर अपलोड केला. तो म्हणतो की, तो फोटो लोकांचे फोन खराब करीत आहे याची मला कल्पना नव्हती.

दरम्यान, लाइटरूममध्ये फोटो सेव्ह करण्यापूर्वी कलर मोड बदलण्यास सांगितले जाते, आणि अग्रवालने निवडलेला मोड कदाचित अँड्रॉइड फोनला सपोर्ट करत नाही. अग्रवाल यांच्याकडे आयफोन आहे आणि हेच कारण आहे की त्याच्या फोनमध्ये या फोटोमुळे कोणतीही समस्या नव्हती.

वापरकर्त्याच्या तक्रारीत असे आढळले की, ज्यांचे फोन Android 10 वर कार्य करतात, त्यांना ही समस्या आहे. ट्विटरवरील एका टेक ब्लॉगरने या समस्येचे कारण स्पष्ट करत म्हंटले कि, जेव्हा कलरची बाब येते, तेव्हा अँड्रॉइड फोन एसआरजीबी (स्टँडर्ड रेड ग्रीन ब्लू) फॉरमॅटला सपोर्ट करतो आणि या व्हायरल फोटोच्या बाबतीतही आरजीबीला फॉलो केले जाते. पुढे सांगितले गेले की, Android 11 वर काम करणारे फोन आपोआप त्याचा फॉरमॅट बदलून स्वतःचे कम्पॅटिबल बनवतात, परंतु Android 10 सह असे होत नाही आणि फोन क्रॅश होतो.