Video : ‘विरार रुग्णालयातील दुर्घटना ही काही नॅशनल न्यूज नाही’; आरोग्य मंत्र्यांचं विधान

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन : विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील कोविड सेंटरला भीषण आग लागली. येथील कोविड सेंटरमध्ये एसीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत. विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. याच दरम्यान आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे.

“विरार रुग्णालयातील दुर्घटना ही काही नॅशनल न्यूज नाही” असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तसेच “आपण रेमडेसिवीरवर बोलू शकतो. ऑक्सिजनबाबत बोलू शकतो. पण विरारची घटना ही काही नॅशनल न्यूज नाही. ही राज्यातील घटना आहे. राज्य सरकार त्यावर सर्वोतोपरी मदत करेल” असं टोपे यांनी म्हटलं आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींशी ऑक्सिजनसंदर्भात बोलणार आहोत. रेमडेसिवीरसंदर्भात बोलणार आहोत. ही घटना (विरार रुग्णालय आग) ही नॅशनल न्यूज नाही. आम्ही राज्य सरकारच्या वतीने पूर्णपणे मदत करणार आहोत” असं आरोग्य मंत्र्यांनी म्हटलं आहे.

तसेच , राजेश टोपे यांना एका पत्रकाराने १३ जणांचा मृत्यू झाला ही नॅशनल न्यूज नाही का?, असं विचारलं असता यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी असं उत्तर दिल. “अरे बाबा, राज्य सरकारच्या अंतर्गत आम्ही पूर्ण मदत करणार आहोत. यामध्ये महापालिकेकडून ५ लाखांची, राज्य सरकारकडून पाच लाखांची अशी दहा लाखांची मदत देणार आहोत. नाशिकमधील घटनेप्रमाणेच इथेही मदत दिली जाईल. कोणत्याही इमारतीचे फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट आणि इलेक्ट्रीकल ऑडिट करणं आवश्यक असतं. हे नियम न पाळणाऱ्या आणि त्यासंदर्भात दोषी असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणात सखोल चौकशी केली जाणार आहे. १० दिवसांत यासंदर्भात अहवाल सादर केला जाईल. घडलेली घटना दुर्देवी आहे” .

“महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू आहे. ठाकरे सरकारने आता हा प्रतिष्ठेची मुद्दा न बनवता केंद्र सरकार, लष्कराची मदत घ्यावी. महाराष्ट्रातील सर्व कोविड केंद्रामधील ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तातडीने करण्यात यावं. यासाठी या श्रेत्रातील तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी. तसेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे” असं मत किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलं आहे. भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यावरून हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. “महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू आहे. ठाकरे सरकारने आता हा प्रतिष्ठेची मुद्दा न बनवता केंद्र सरकार, लष्कराची मदत घ्यावी” असं म्हटलं आहे. तसेच राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे असं देखील ते म्हणाले आहेत.