अब की बार, 10 हजार पार…विक्रमवीर विराट कोहलीचा आणखी एक विक्रम 

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था  – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने  वनडेत विक्रमी कामगिरी करत आपल्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला आहे. त्याने वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा पल्ला ओलांडला आहे. ही कामगिरी बजावणारा विराट हा सचिन, गांगुली, द्रविड आणि धोनी यांच्या नंतरचा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे.
विशाखापट्टणम येथे सुरु असणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शतकी खेळी करणारा भारताचा कर्णधार विराट कोहली याने दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील आपला १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. विशेष म्हणजे वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या इतिहासात सर्वात जलद दहा हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे.  सचिनने २५९ डावांमध्ये हा टप्पा गाठला होता. मात्र विराटने केवळ २०५ डावांमध्ये हा पराक्रम केला. सर्वात जलद, सर्वात जास्त सरासरी धावसंख्येने तसेच सर्वात कमी बॉल खेळून त्याने हा विक्रम रचला आहे.
दरम्यान, विराट कोहली वनडेत वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. २९ डावांमध्ये त्याने १५७४  धावा केल्या आहेत. विराटने सचिनचा ३९  डावांमध्ये १५७३ धावांचा विक्रम मागे टाकला.विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३६ शतके आणि ४९ अर्धशतके झळकावली आहेत.