IND vs NZ : चौथ्या सामन्यात विराटच्या जागेवर खेळणार ‘हा’ खेळाडू ?

वेलिंग्टन : वृत्तसंस्था – टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत 3-0 ने आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे. उर्वरित दोन सामने केवळ औपचारिकच असणार आहेत. त्यामुळे उरलेल्या सामन्यात भारत राखीव खेळाडूंचा वापर करणार आहे. चौथ्या सामन्यातून संघात युवा फलंदाज शुबमन गिल याला घेण्याचे संकेत संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिले आहेत.

आम्ही आतापर्यंतचे सामने एकतर्फी जिंकलेत. पुढचे दोन सामनेही असेच जिंकण्याची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियानंतर न्यूझीलंडमध्येही विजय मिळवल्यामुळे चांगलं वाटतंय. आता मी माझ्या सुट्ट्या निश्चिंतपणे एंजॉय करु शकतो, असं मनोगत विराटने व्यक्त केले.

पुढच्या दोन सामन्यांसाठी विराटला विश्रांती देण्यात येणार आहे. त्यामुळे विराटच्या जागेवर पर्यायही विराटने सुचवला आहे. कधी ना कधी कुणी तरी आपली जागा घेतंच, खेळात असंच चालतं. शुबमन हा उत्कष्ट खेळाडू आहे. त्याला नेट्सवर खेळताना मी पाहिलंय आणि त्याच्या फलंदाजीने मी प्रभावित झालोय. मी 19 वर्षांचा होतो तेव्हा त्याच्या 10 टक्केही फलंदाजी करत नव्हतो, असं स्वतः विराटने म्हटलं आहे.

दरम्यान, शुबमन गिल हा उदयोन्मुख फलंदाज आहे. विराट कोहलीप्रमाणेच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी तो ओळखला जातो. त्यामुळे भारतीय संघात त्याला विराटच्या जागेवर संधी दिली जाऊ शकते. न्यूझीलंडमध्ये शुबमनचं रेकॉर्ड चांगलं आहे. अंडर 19 विश्वचषकातून शुबमनचं भाग्य चमकलं होतं, तो विश्वचषक न्यूझीलंडमध्येच खेळवण्यात आला होता.

टीम इंडियाचा किवींवर मालिका विजय