सचिनची बरोबरी करायला विराटला अजून दहा वर्ष लागतील !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या वर्षात भारतीय क्रिकेट संघाला जगात यशामागून यश मिळत आहे. त्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यासोबतच विराट कोहलीची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी केली जात आहे. विराट लवकरच सचिनचे सर्व विक्रम मोडेल, अशी चर्चा क्रिकेट विश्वात सुरू आहे.

विराटच्या खेळातील धावांची आकडेवाकरी पाहिल्यास सचिनला मागे टाकण्यासाठी विराटला आणखी आठ ते दहा वर्षे लागण्याची शक्यता आहे. अर्थात, हे विक्रम गाठण्यासाठी विराटला त्याचा सध्याचा फॉर्म टिकवून ठेवावा लागणार आहे. विराटला सचिनचे विक्रम गाठण्यासाठी किती वेळ लागेल यावर क्रिकेट विश्वातील जाणकरांनी दोघांच्या धावांचे आणि विक्रमांचे गणित जुळवायला सुरुवात केली आहे.

२०१८ मध्ये विराटनं क्रिकेटच्या मैदानावर जबरदस्त कामगिरी केली आहे. २०१८ मध्ये विराटनं १३ कसोटी सामन्यांत ५५.१ च्या सरासरीनं १,३२२ धावा केल्या आहेत. या धावांत ५ शतकांचा समावेश आहे. तर, १४ एकदिवसीय सामन्यांत १३३.६ च्या सरासरीनं १,२०२ धावा केल्या आहेत. त्यात ६ शतकांचा समावेश आहे. विराटच्या या जबरदस्त कामगिरीची आयसीसीने दखल घेतली. त्यामुळे विराट आयसीसी २०१८ च्या तीन पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे. कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारातील सर्वोत्तम खेळाडू असे पुरस्कार विराटला मिळाले आहेत.

दरम्यान, सचिन तेंडुलकरनं कसोटी कारकिर्दीतील २०० सामन्यांत ५३.७९ च्या सरासरीनं १५,९२१ धावा केल्या आहेत. त्यात ५१ शतकं आहेत. तर, ४६३ एकदिवसीय सामन्यांत ४४.८३ च्या सरासरीनं १८,४२६ धावा केल्या आहेत. त्यात ४९ शतकांचा समावेश आहे. तर विराटने आतापर्यंतच्या कारकिर्दीत ७७ कसोटी सामने खेळले असून ५३.८ च्या सरासरीनं ६,६१३ धावा कुटल्या आहेत. यात २५ शतकांचाही समावेश आहे. तर, एकूण २१९ एकदिवसीय सामन्यांत ५९.७ च्या सरासरीनं १०,३८५ धावा केल्या आहेत. त्यात ३९ शतकं आहेत.