विराट कोहलीच्या ‘या’ कृत्यामुळे झाला ५०० रुपयांचा दंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नगरपालिकेच्या पाईपलाईनमधून मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्याने गाड्या धुण्यासाठी गैरवापर केल्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला गुडगाव नगरपालिकेने दंड ठोठावला आहे. कोहलीच्या घराची देखरेख करणाऱ्या दीपक कडून या दंडाची वसुली करण्यात आली. विराट सध्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी इंग्लंडमध्ये आहे.

‘डीएलएफ फेज-१ सी-1/10’ या गुडगाव येथील कोहलीच्या राहत्या घराबाहेर अनेक गाड्या उभ्या असतात. यामध्ये २ एसयूव्ही देखील आहेत. या गाड्यांना धुण्यासाठी दररोज घराशेजारील पाइपलाइनमधून कित्येक लीटर पाणी वापरलं जातं, अशी कोहलीच्या शेजाऱ्यांची तक्रार आहे. यासंदर्भात घराची देखरेख करणाऱ्या दीपक ला अनेकदा समजावून देखील काहीच फरक न पडल्याने तक्रार करण्यात आली. यानंतर पालिकेने कोहलीच्या पत्त्यावर नोटीस पाठवून दंडाचे ५०० रुपये वसुल केले.याबाबत अधिकाऱ्यांना जेई अमन फोगाट यांना विचारलं असता पाण्याचा अपव्यय केल्याप्रकरणी कोहलीसह परिसरातील आणखी १० जणांना दंड ठोठावण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.