मैदानावर उतरण्यापुर्वी तुमचा माज घरी ठेवून या ; विराटचा कांगारूंना सल्ला

सिडनी : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील दमदार विजयामुळे भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. त्यानंतर भारतीय संघाचे अभिनंदन होत आहे. त्यासोबतच ऑस्ट्रेलियन संघांवर टिकेचा भडिमार सुरु आहे. कारण ऑस्ट्रेलिया संघाचे फलंदाज भारतीय गोलंदाजीपुढे टिकू शकले नाहीत.

२०१९मध्ये ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडमध्ये अॅशेस मालिकेसाठी जाणार आहे. त्यामुळे या मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन संघाला कानमंत्र दिला आहे.

जर इंग्लंडमध्ये तुम्ही माज घेऊन मैदानात उतरलात, तर कदाचीत तुमचा काहीही फायदा होणार नाही. इंग्लंडमध्ये डुके बॉल तुमचा सगळा माज उतरवतो, त्यामुळे मैदानात उतरताना माज घरीच ठेवून या, असा सल्ला विराटने दिला आहे. तो पत्रकारांशी बोलत होता.

इंग्लंडमध्ये स्वतःवर ताबा ठेवून संयमाने फलंदाजी करणं गरजेचं असतं. इंग्लंडमधल्या वातावरणाशी जुळवून घेणं ही एक मोठी कसोटी असते. योग्य वेळ घेऊन धावा काढण्याच्या संधी शोधणं हे फलंदाजाचं कौशल्य आहे, मात्र सतत धावसंख्येकडे नजर ठेवाल तर तुमचं मैदानावरचं चित्त लगेच ढळू शकतं, असंही त्याने सांगितलं.

दरम्यान, २००१ सालापासून ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकू शकलेला नाहीये. त्यामुळे विराटने दिलेल्या सल्ल्याचे ऑस्ट्रेलियन संघ पालन करतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.