MS धोनी आणि अझरुद्दीन यांच्यानंतर ‘हा’ विक्रम करणारा विराट ठरला तिसरा कर्णधार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काल पुणे येथे इंग्लंड आणि भारत यांच्यामध्ये झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या नावावर अजून एक विक्रम नोंदवण्यात आला आहे. विराट कोहली हा भारतासाठी २०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तिसरा कर्णधार ठरला आहे. या अगोदर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नावावर हा विक्रम आहे. अझरुद्दीनने २२१ सामन्यांत तर, धोनीने ३३२ सामन्यांत भारताचे कर्णधारपद सांभाळले आहे.

डिसेंबर २०१४ मध्ये महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहलीला भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद देण्यात आले. त्यानंतर धोनीने जानेवारी २०१७ मध्ये मर्यादित षटकांचे कर्णधार पद सोडल्यानंतर विराट कोहलीला तीनही स्वरूपात टीम इंडियाचा कर्णधार बनविण्यात आले.

असा झाला तिसरा वनडे सामना
पुण्याच्या गहुंजे मैदानावर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात भारताने इंग्लंडवर ७ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे भारताने हि मालिका २-१ अशी जिंकली आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात शिखर धवन, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने इंग्लंडसमोर ३३० धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला फक्त ३२२ धावाच करता आल्या. इंग्लंडची आघाडीची फळी लवकर बाद झाली तरी इंग्लंडच्या सॅम करनने शेवटपर्यंत किल्ला लढवला पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. त्याने या सामन्यात नाबाद ९५ धावा करत टीम इंडियाचे टेन्शन वाढवले होते. इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या षटकात १४ धावांची गरज असता भारताच्या यॉर्कर स्पेशालिस्ट टी. नटराजनने या षटकात अवघ्या ६ धावा देत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यानंतर सॅम करनला सामनावीर, तर जॉनी बेअरस्टोला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.