Forbes 100 : फेडरर सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू, यादीत कोहली एकमेव क्रिकेटपटू

पोलीसनामा ऑनलाईन : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. गेल्या दशकात कोहलीने केवळ आपल्या खेळामुळेच अनेक रेकॉर्ड मोडले नाहीत तर क्रिकेट इतिहासातील महान फलंदाजांमध्येही आपले स्थान निर्माण केले आहे. कोहलीच्या मैदानावरील कामगिरीचा परिणाम मैदाना बाहेरही दिसून येतो आणि तो मोठ्या ब्रँडचा आवडता चेहरादेखील आहे. त्यामुळे मैदानातील कोहलीची कमाई इतर कोणत्याही क्रिकेटपटूच्या तुलनेत जास्त आहे. हेच कारण आहे की, कोहलीने सलग दुसर्‍या वर्षी फोर्ब्स मासिकाच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळविले आहे.

फेडरर अव्वल स्थानी
फोर्ब्सने शुक्रवारी 29 मे रोजी आपली वार्षिक यादी जाहीर केली, ज्यात सर्वाधिक कमाई करणार्‍या खेळाडूंचा समावेश होता. या यादीमध्ये महान टेनिसपटू स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. फेडररची वार्षिक कमाई 106.3 मिलियन डॉलर (जवळपास 802 कोटी ) आहे. फेडररने या यादीमध्ये प्रथम स्थान गाठले आहे. त्यानंतर युव्हेंटस फुटबॉल क्लबचा पोर्तुगीज स्टार क्रिस्टियानो रोनाल्डो दुसर्‍या क्रमांकावर ( 105 मिलियन डॉलर्स) तर बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी तिसऱ्या क्रमांकावर (104 मिलियन डॉलर्स) आहे.

क्रिकेटर कोहली सलग दुसर्‍या वर्षी या यादीत
बास्केटबॉल, फुटबॉल, रग्बी, टेनिस स्टारने भरलेल्या या यादीमध्ये विराट कोहली हा एकमेव क्रिकेटपटू आहे. 2019 मध्ये जाहीर झालेल्या यादीमध्ये कोहली देखील एकमेव क्रिकेटपटू होता. मागील वर्षी या यादीत कोहली 100 क्रमांकावर होता, परंतु यावर्षी कोहली 66 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. कोहलीची वार्षिक कमाई 26 मिलियन डॉलर्स आहे. विशेष म्हणजे यापैकी कोहलीला केवळ 2 मिलियन डॉलर्स वेतन किंवा मॅच फी म्हणून दिले जाते. उर्वरित 24 दशलक्ष डॉलर्स विविध कंपन्यांच्या जाहिरातींमधून कोहलीने कमावले आहेत. कोहली ऑडी इंडिया, पुमासह अनेक बड्या कंपन्यांचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे.

तसेच या यादीत जपानची टेनिस स्टार नाओमी ओसाका सर्वाधिक कमाई करणारी महिला खेळाडू आहे. ओसाकाचे वार्षिक उत्पन्न 37.4 मिलियन असून तिने अनुभवी स्टार सेरेना विल्यम्स ( 36 मिलियन ) ला मागे टाकले आहे. ओसाका 29 व्या तर सेरेना 33 व्या स्थानावर आहे. यादीतील पाहिजे 35 खेळाडू बास्केटबॉलशी संबंधित आहेत, तर 31 अमेरिकन फुटबॉल (रग्बी) आणि 14 फुटबॉलशी संबंधित आहेत.

हे आहेत टॉप 10 खेळाडू :
रॉजर फेडरर, टेनिस – 106.3 मिलियन
क्रिस्टियानो रोनाल्डो, फुटबॉल – 105 मिलियन
लिओनेल मेस्सी, फुटबॉल – 104 मिलियन
नेमार ज्युनियर, फुटबॉल – 95.5 मिलियन
लेब्रॉन जेम्स, बास्केटबॉल – 88.2 मिलियन
स्टीफन करी, बास्केटबॉल – 74.4 मिलियन
केविन ड्युरंट, बास्केटबॉल – 63.9 मिलियन
टायगर वुड्स, गोल्फ – 62.3 मिलियन
कर्क कजिन, रग्बी – 59.1 मिलियन