आता कौमार्य चाचणी केल्यास होणार गुन्हा दाखल ; लवकरच अधिसुचना निघणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी पुण्यातील उच्चभ्रू वर्गातील कौमार्य चाचणी प्रकरण उघडकीस आले होते, वेळोवेळी अशा घटना समोर आल्या आहेत.अमानवीय कौमार्य चाचणीच्या प्रथेवर मात्र त्यावर अद्याप कोणताही रीतसर गुन्हा दाखल करण्यात येत नव्हता पण आता मात्र लवकरच कौमार्य चाचणी हा लैंगिक अत्याचार मानला जाणार असून यासंदर्भात गुन्हा नोंद होणार आहे. यासंबंधी लवकरच अधिसुचना काढण्यात येणार आहे. याची सूचना राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात येणार असल्याचा निर्णय गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी घेतला आहे.

महाराष्ट्र सरकारने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा २०१७ मध्ये लागू करण्यात आला. जातपंचायतीच्या पंचाचा समाजात वाढता दबाव व कांजारभाट समाजातील नवविवाहित वधूना कौमार्य चाचणी सक्तीने घेण्यात येते याबाबत शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सन २०१८ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित केली होती. जातपंचायत कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे पालन केले जावे व या कायद्याची जनजागृती होण्यासाठी आज आ.डॉ.गोऱ्हे यांनी शिष्टमंडळासह गृह राज्यमंत्री ना.डॉ.रणजित पाटील यांनी बैठक घेतली.

महाराष्ट्रात जातपंचायतीच्या आता पर्यंत घडलेल्या घटनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. पुरोगामी महाराष्ट्रात वारंवार जातपंचायतीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे असे या बैठकीत निदर्शनास आले. जातपंचायतीच्या पंचांचा प्रत्येक जात मध्ये खूप मोठा हस्तक्षेप असल्याने यांच्या विरोधात गुन्हे नोंद होत नसल्याने याबाबत काही तरी कठोर पावले उचलण्याची मागणी यावेळी आ.डॉ.गोऱ्हे यांनी केली. यात प्रामुख्याने पोलीस दलाच्या Protection against violence for Women या सेलकडे नोंद घेण्यात यावी. या जातपंचायत विरोधी कायद्याबाबत पोलिसांची प्रबोधन करण्याची गरज यावेळी त्यांनी व्यक्त केली.

जातपंचायत विरोधी समितीत काम करणाऱ्या नागरिकांना जिल्ह्यातील PCR दक्षता समितीमध्ये एक सदस्यांचा समावेश करण्याची सूचना ही आ.डॉ.गोऱ्हे यांनी मांडली. यावरती निर्णय देताना गृह राज्यमंत्री यांनी गृह विभागाला आदेश दिले की, कौमार्य चाचणी हा लैंगिक हिंसाचार म्हणून नोंद करुन जातपंचायत च्या विरोधात सामाजिक बहिष्काराबाबत कारवाईचा पोलीसांच्या PCR — Protection of civil rights (नागरी हक्क संरक्षण) समित्यांनी जिल्हावार आढावा घेण्यासाठी अधिसुचना काढण्याबाबत आदेश दिले. विधी व न्याय प्राधिकरण मध्ये जातपंचायत विरोधी समितीचे सदस्य कृष्णा इंद्रेकर यांची नियुक्ती करण्यातबाबत सूचना देण्यात आली आहे. नागपूर जातपंचायत अत्याचार घटनेत कडक कारवाई चे डॉ. पाटील यांनी आदेश दिल्याचे आ.डॉ. नीलम गोर्हे यांनी सांगितलेआहे.

यावेळी व्यंकटेश भट- उपसचिव गृह, प्रमोद साईल-पोलीस उपअधीक्षक नागरी हक्क सरंक्षण, क.दै. विधाते-पुणे पोलीस सहाय्यक आयुक्त,सामाजिक न्याय विभागाचे ऊपसचिव श्री.सं. गि पाटील, बी.जी. गायकवाड-पोलीस निरीक्षक, मीनाक्षी राणे-पोलीस निरीक्षक, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा इंद्रेकर,अँड. नंदिनी जाधव, अँड.रंजनी गावंदे, राजेश नगरकर हे उपस्थित होते.

कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणी क्रौर्य …

लग्न लागल्यानंतर या जोडप्याला लॉजवर एका खोलीत नेलं जातं. बाहेर पंच थांबतात. मुलीच्या अंगावरील दागिने, केसांच्या पिना काढून घेतल्या जातात. ठरवून दिलेल्या वेळेमध्ये या जोडप्याने शरीरसंबंध प्रस्थापित करून पंचानी दिलेल्या पांढऱ्या चादरीवर रक्ताचा डाग बाहेर आणून दाखवायचा. जर तो नसेल तर ‘माल खराब निघाला’, असं म्हणत त्या मुलीची जाहीर नालस्ती केली जाते. हे कुणामुळे झालं, असं विचारून तिच्याकडून मुलाचे नाव वदवून घेतलं जातं. खेळामुळे, व्यायामामुळे, दगदग झाल्यामुळे वा इतर कोणत्याही कारणांमुळे असं होऊ शकतं, हा विचारच इथे केला जात नाही.

आता संसार मोडणार, मार पडणार या भीतीने या मुली अनेकदा ‘बाहेरचा’ असं सांगून मोकळ्या होतात. समाजातल्या कुणा मुलाचं नाव घेतलं तर त्याला पंचाच्या पुढे आणून उभं केलं जातं, दंड भरावा लागतो, शिवाय या मुलीला मारहाणही केली जाते. मुलीला मारल्यानंतर जर नवऱ्याने नांदवायला नकार दिला, तर त्या मुलीचं आयुष्य पणाला लागतं. मुलगी नांदली तरी लग्नापूर्वी कुणाशी तरी शरीरसंबध होते, ही बोच त्या मुलाच्या मनात कायम राहते. वर्षोनुवर्षे त्यावरून वाद झडत राहतात.मात्र या सगळ्यातून कुणाचाही खासगीपणाचा अधिकार जपला जात नाही, हे जातपंचायतीला कबूलच नाही.