सावधान ! 4 कोटी लोकांच्या ‘फोन’मध्ये आहे 2020 चं ‘हे’ सर्वात धोकादायक ‘अ‍ॅप’, त्वरित ‘हटवण्याचा’ सल्ला

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अ‍ॅपमध्ये व्हायरस असण्याच्या बातम्या दररोज येतच असतात. नवीन अहवालात म्हटले आहे की गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 2020 च्या पहिल्या तिमाहीत एकूण मैलिशयस मोबाइल अ‍ॅप्सची संख्या दुप्पट झाली आहे. परंतु यापेक्षाही आणखी धोकादायक बाब समोर आली आहे ती म्हणजे सायबर सिक्युरिटी फर्म अपस्ट्रीम सिस्टमने आपल्या अहवालात म्हटले आहे की तब्बल 4 कोटी लोकांनी 2020 चे सर्वात धोकादायक अ‍ॅप ‘Snaptube’ डाऊनलोड केले आहे.

स्नॅपट्यूबला चिनी कंपनी मोबीस्पेस (Mobiuspace) ने तयार केले आहे. अहवालानुसार हे अ‍ॅप फोनमध्ये डाउनलोड केल्यानंतर वापरकर्त्यांना परवानगीशिवाय प्रीमियम सेवेसाठी साइन अप करण्याची परवानगी देते. या व्यतिरिक्त ते अ‍ॅड-क्लिक अ‍ॅक्टिविटी देखील करू शकते, ज्यामध्ये ते जाहिराती स्वतःच डाउनलोड करते आणि त्यावर क्लिक देखील करते.

या फोनच्या गॅलरीमध्ये आधीपासूनच अस्तित्त्वात आहे हे अ‍ॅप

या अ‍ॅपद्वारे वापरकर्ते लोकप्रिय व्हिडिओ आणि ऑडिओ स्ट्रीमिंग साइट जसे की यूट्यूब व फेसबुकवरील व्हिडिओ आणि ऑडिओ डाउनलोड करू शकतात. स्नॅपट्यूबची स्वतःची वेबसाइट असल्याचेही उघड झाले आहे. या वेबसाइटनुसार जगभरातील 30 कोटी वापरकर्त्यांद्वारे हे अ‍ॅप डाउनलोड करण्यात आले आहे. तसेच हे अ‍ॅप हुवावेच्या अ‍ॅप गॅलरीवर उपलब्ध असल्याचेही समोर आले आहे. या अहवालात म्हटले आहे की गेल्या वर्षी स्नॅपट्यूबच्या माध्यमातून 7 कोटीहून अधिक फसवणूकीचे व्यवहार झाले होते. तसेच यावर्षी 3 कोटीहून अधिक फसवणूकीचे व्यवहार उघडकीस आले आहेत, ज्यास सिक्योर-डी प्लॅटफॉर्मद्वारे अवरोधित केले गेले आहे.

हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर नाही

गुगलने यापूर्वीच प्ले स्टोअर वरून हे अ‍ॅप हटविले आहे, परंतु वापरकर्ते अद्याप थर्ड-पार्टीकडून हे अ‍ॅप डाउनलोड करीत आहेत. आपण अँड्रॉइड वापरकर्ता असल्यास आणि आपल्या फोनमध्ये हे अ‍ॅप असल्यास त्यास त्वरित हटवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.