विशाखापट्टणम : पोलीसनामा ऑनलाईन – Visakhapatnam Accident News | आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर सिंहाचलम येथे भीषण अपघाताची घटना घडल्याचे समोर आले आहे. मंदिराजवळील सिमेंटची भिंत अचानक कोसळल्याने ८ भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. ३०० रुपयांच्या तिकीट लाइनमध्ये उभे राहून भाविक मंदिराकडे जात असताना, ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि भिंतीचा पाया कमकुवत झाल्यामुळे ही घटना घडली आहे. सिंहगिरी बसस्थानकापासून वर जाताना मंदिराला लागून असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळील ही भिंत होती. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू केले आहे. राष्ट्रीय आपत्ती दल आणि राज्य आपत्ती दलच्या टीम बचाव कार्यात गुंतल्या आहेत. तसेच, अग्निशमन दल आणि पोलीस दलही मदत आणि बचाव कार्यात सहकार्य करत आहेत. ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक भाविक अडकले असावेत, अशी शक्यता आहे.
गृहमंत्री व्ही. अनिथा, विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त घटनास्थळी पोहोचले आहेत. मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. मुसळधार पावसामुळे माती ओली झाली, त्यामुळे भिंत कोसळल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि पीडितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे, असे त्यांनी सांगितले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.