अन् त्यांच्याकडून एक ‘चूक’ झाली, पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये सोनसाखळी चोरणारे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यासह पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पादचारी महिलांच्या गळ्यातील सोन साखळी चोरून धुमाकूळ घालणारे चोरटे केवळ इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीवरून पोलिसांच्या गळा लागले आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यापर्यंत पोलीस पोहचले आहेत. त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पळून जाताना त्यांना फिल्मी स्टाईलने पाठलागकरून पकडण्यात आले आहे.

दिपक परशुराम माळी (वय 21, रा. केशवनगर, मुंढवा) आणि प्रविण निलेश कछवे (वय 30) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

शहरात घरफोड्या आणि सोन साखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. तर, दुसरीकडे लुटमारीच्या घटनांनी शहर हादरून गेले असून, पुणेकरांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, विश्रांतवाडी परिसरात तीन दिवसांपुर्वी केवळ दहा मिनिटांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पादचारी महिलांच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावण्यात आल्या होत्या. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या चोरट्यांचा माग गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीस करत होते. दरम्यान, पोलीसांनी सीसीटीव्हीची पडताळणी केली. त्यात आरोपी कैद झाले होते. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक अरूण आव्हाड, सहायक निरीक्षक संदीप यादव तसेच गुन्हे शाखेच्या युनिट चारमधील अतुल मेंगे व अशोक शेलार आणि त्यांचे पथकाने या दोघांना केशवनगर परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची माहिती दिली. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली आहे.

असा लागला चोरट्यांचा माग
सोन साखळी चोरट्यांना घटनास्थळी पाहिलेल्या प्रत्यक्ष दर्शी तसेच फिर्यादी यांना विचारपूस केल्यानंतर त्यांचे वर्णन पोलिसांना मिळाले. त्यानंतर पोलीसांनी विक्षांतवाडी परिसरातील खासगी तसेच शासकीय सीसीटीव्ही तपासले. ते तपासात असताना एका ठिकाणी चोरटे कैद झाले. त्यामुळे पोलिसांनी या परिसरातील तसेच विमाननगर येथून नगर रस्त्यावरून खराडीकडे केशवनगर मुंढवा भागात जाताना येथील रस्त्यांवरचे सीसीटीव्ही तपासले. त्यातही चोरटे कैद झाले.

मात्र, केशवननगर चौकातून पुढच्या सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले नव्हते. त्यामुळे पोलिसांना चोरटे हे केशवनगर परिसरातच असण्याची शक्यता गृहित धरून त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी चोरट्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली नंबर नसणारी होंडा शाईन दुचाकी एका इमारतीच्या पार्किंगमध्ये दिसून आली. त्यानुसार पोलिसांनी याठिकाणी सापळा रचला. काही वेळातच दोघेजन तेथे आले. एकाने चावी लावून गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेतली. मात्र, पोलीस पाहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना पाठलागकरून पकडले.

चोरट्यांनी सांगवी तसेच खडकी आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोन साखळ्या हिसकावल्या आहेत. पोलिसांनी केवळ सीसीटीव्हीच्या मदतीने त्यांना पकडले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/