घडणार होता अनर्थ पण…पोलिसांच्या सतर्कतेमुळे ‘बालविवाह’ रोखला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विश्रांतवाडी येथे एका सतरा वर्षीय मुलीचा चौवीस वर्षीय मुलाशी होऊ घातलेला बालविवाह पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोखण्यात आला. विश्रांतवाडी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाई करत तिच्या आई व़डीलांचे समुपदेशन केले आणि त्यांच्याकडून तिचे वय १८ वर्षे पुर्ण झाल्यानंतर लग्न करण्याची ग्वाही लिहून घेतली.

विश्रांतवाडी येथील एकता नगरमधील एका २४ वर्षीय तरुणाचा विद्यानगरमधील १७ वर्षीय मुलीशी २३ मे रोजी विवाह होणार आहे. हा विवाह विद्यानगगरमधील मंगल कार्यालयात पार पडणार असल्याची माहीती विश्रांतवाडी पोलिसांना स्थानिक नागरिकाकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी २२ मे रोजी नवरा मुलगा आणि मुलीचे आई वडील यांना पोलीस ठाण्यात बोलवून तिच्या वयाची खात्री केली. तिच्या प्रमाणपत्रांची पोलिसांनी तपासणी केली. दरम्यान तिचे वय १७ वर्षे असल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी मुलीच्या आई वडीलांचे समुपदेशन केले. त्यानंतर त्यांना बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असल्याचे पटवून देत पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली. त्यानंतर तिचे वय कमी असल्याने तिचे लग्न उद्या करणार नसल्याची ग्वाही आई वडीलांनी दिली. त्यात पोलिसांना २३ मे रोजी लोकसभा निवडणूकीच्या निकालाचा बंदोबस्त होता. परंतु तरीही पोलिसांनी खबरदारी म्हणून मंगल कार्यालयाच्या समोर पोलिसांची नेमणूक करण्यात आली.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चौगूले, सहायक पोलीस फौजदार जब्बार शेख, कर्मचारी दिनकर लोखंडे, विनायक रामाणे, नितीन साबळे, शिवाजी गोपणार, विष्णू झांझुर्णे, महिला कर्मचारी कामीनी पवळे यांच्या पथकाने केली.