शहरातील गुन्हेगारीचा नायनाट करणार : विश्वास नांगरे पाटील

सांगली | पोलीसनामा आॅनलाइन – जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी टोळ्यांचा बंदोबस्त करणार आहे. अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी दिली.

विश्वास नांगरे-पाटील गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील पोलिस ठाण्याची तपासणी करण्याच्या दौर्‍यावर आहेत. गुरूवारी कुपवाड पोलिस ठाण्यात त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी या भागातील जनता, व्यापारी संघटना, शांतता समिती, विविध संस्थांचे पदाधिकारी, उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी प्रभारी पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, मिरजेचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत भारती यांची प्रमुख उपस्थिती होती.

२ लाखांचे लाच प्रकरण : गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हवालदाराला पुण्यात अटक

ते म्हणाले, कुपवाड शहरासह जिल्ह्यात घरफोडी, चेनस्नॅचिंगचे प्रमाण वाढले आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस अधिकार्‍यांना  योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच खून, खुनीहल्ला यातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. मोकासह तडीपारीची अनेक जणांविरुद्ध गेल्या सहा महिन्यांत कारवाई करण्यात आली आहे. येणार्‍या काळातही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी काही टोळ्यांचा लवकरच बंदोबस्त करण्यात येणार आहे. त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.
वाहतूक व्यवस्थेचा आराखड्याविषयी बोलताना विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, सीसीटीव्ही कॅमेर्‍यासह पोलिस चौकीसारखे अनेक चांगले उपक्रम शहरात राबविण्यात आले आहेत. तसेच अत्याधुनिक यंत्रणेचाही गुन्हे उघडकीस आणण्यासाठी उपयोग होत आहे. विस्कळित  वाहतूक व्यवस्थेसाठी ठोस आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार लवकर शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था शहरासह जिल्ह्यात दिसून येईल.