आश्चर्यजनक ! ‘या’ शहरात चक्क ११ मजली मातीच्या इमारती  

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण पाहतो की मातीची घरे आता हद्दपार होताना दिसत आहे. जिथे पाहावं तिथे आता सिमेट काँक्रीटची घरे दिसतात. विकसित तंत्रज्ञान आणि वाढते शहरीकरण यामुळे घरे सिमेंट किंवा दगडी असलेली दिसतात. ग्रामीण भागात पाहिले तर काही मातीची घरे दिसतील देखील. परंतु आता अशा घरांचे प्रमाण मात्र दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. तसं पाहिलं तर मातीची घरे ही जोरदार पाऊस, वादळ अशा काही कारणांमुळे जमीनदोस्त होण्यास फारसा वेळ लागत नाही. यामुळेच सध्या घरे बांधण्यासाठी सिमेंट, दगड, वाळू आणि लोखंडाचा वापर होताना दिसून येतो. असे असले तरी एखादे लहानसे घर बांधण्याचा आपण एकवेळ विचार करू शकतो. मात्र, मातीनेच बहुमजली इमारत बांधण्याची कल्पनाही करू शकत नाही. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की जगात एक असे शहर आहे जेथे केवळ मातीची घरे. तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु ही घरे छोटी नसून बहुमजली घरे आहेत. येमेनमधील ‘शिबम’ असे या शहराचे नाव आहे.
येमेनमधील ‘शिबम’ येथे ज्या बहुमजली मातीच्या इमारती आहेत त्या अशा पद्धतीने बांधल्या आहेत की, त्यांच्यावर पाऊस, वादळ अथवा चक्रीवादळाचाही काडीमात्र परिणाम होऊ शकत नाही. या शहराला वाळवंटातील ‘मॅनहॅटन’ असे म्हणतात. वाळवंटातील या मॅनहॅटन शहरात सध्या 500 हून अधिक इमारती  आहेत. यामधील बहुतेक इमारती 5 ते 11 मजली आहेत. या शहरात लोकवस्ती विरळ आहे, तरीही येथील लोक आपल्या मातीच्या घराची देखभाल करण्यात कसलीच कसर सोडत नाहीत.
1530 मध्ये या शहरात प्रचंड महापूर आला होता. यामुळे संपूर्ण शहर उद्ध्वस्थ झाले होते. या नैसर्गिक आपत्तीनंतर पुन्हा या शहराची उभारणी करण्यात आली होती. 2008 मध्ये आलेल्या चक्रीवादळात या घरांचे मोठे नुकसान झाले. मात्र, तेथील लोकांनी महत्प्रयासाने आपली मातीची घरे दुरुस्त करून घेतली. काहीही अडचणी आल्या तरी येथील लोक हार न मानता मोठ्या जिद्दीने त्याचा सामना करतात.
या शहराबाबत एक आश्चर्यची बाब म्हणजे, ज्यावेळी या घरांवर सूर्याची किरणे पडतात, त्यावेळी ती सोनेरी दिसतात. येमेनमधील ‘शिबम’ येथे असणारी ही मातीची बहुमजली घरे व इमारती जगासाठी एक आश्चर्यकारक बाब ठरली आहे.