अर्थमंत्र्यांची भेट घेऊन भारत सोडला : विजय मल्ल्याचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतातील बँकांना हजारो कोटींचा चुना लावून देशाबाहेर पळून गेलेल्या विजय मल्ल्याने लंडनमधील वेस्टमिनिस्टर कोर्टात एक खळबजनक गौप्यस्फोट केला आहे. भारत सोडण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेठली यांची भेट घेतल्याचे मल्ल्याने सांगितले.

लंडनस्थित वेस्टमिनिस्टर कोर्टात ही सुनावणी सुरू आहे. मल्ल्या म्हणाला, ‘बँकेने माझ्या कर्जफेडीसंदर्भातल्या प्रक्रियेविषयी प्रश्न उपस्थित केले होते.’ कोर्टातील सुनावणीनंतर पत्रकारांनी जेव्हा अर्थमंत्र्यांशी झालेल्या भेटीविषयी विचारले तेव्हा मल्ल्याने सांगितले की त्याला या भेटीविषयी अधिक तपशील द्यायचे नाहीत.

जाहिरात

भारतीय अधिकाऱ्यांनी वेस्टमिनिस्टर कोर्टात मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात विजय मल्ल्यासाठी केलेल्या विशेष सेलचा व्हिडिओ दाखवला. भारतीय कारागृहांची अवस्था खराब असल्याने आपल्याला भारताकडे सोपवले जाऊ नये अशी विनंती मल्ल्याने केली होती.

कोर्टाने मल्ल्याच्या प्रत्यार्पणाची परवानगी दिली तर हे प्रकरण ब्रिटनच्या गृहविभागाकडे सोपवण्यात येईल. मल्ल्या कोर्टाच्या निर्णयाला पुढील कोर्टात आव्हानही देऊ शकतो. किंगफिशर एअरलाइन्सचा प्रमुख असणारा ६२ वर्षीय मल्ल्या मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यात जारी झालेल्या प्रत्यार्पण वॉरंटनंतर जामीनावर आहे. त्याच्यावर सुमारे ९ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे.

यापूर्वी जुलैमध्ये झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी भारतीय अधिकाऱ्यांना आर्थर रोड कारागृहाच्या बराक क्र. १२ चा व्हिडिओ जमा करण्यास सांगितलं होतं. त्यानुसार हा व्हिडिओ दाखवण्यात आला. प्रत्यार्पणानंतर ब्रिटनच्या मानवाधिकार संबंधी नियमांची पूर्तता होते वा नाही याची खातरजमा करण्यासाठी तुरुंगाच्या चित्रीकरणाची मागणी करण्यात आली होती.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.