दृष्टिहीन प्रांजल पाटील केरळमध्ये उपजिल्हाधिकारीपदी रुजू

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन

आतापर्यंत प्रांजल पाटील हे नाव सर्वश्रुत आहे. आपल्या प्रचंड जिद्दीच्या जोरावर अवघ्या आठ वर्षात दृष्टी गमावून बसलेल्या प्रांजल ने आय ए एस पर्यंत मजल मारली आहे. उल्हासनगरातील प्रांजल आता प्रत्यक्ष नागरी सेवा हाताळण्यासाठी सज्ज झाली आहे. केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू होऊन नुकताच पदभार स्वीकारला आहे. आता यानिमित्ताने या महाराष्ट्रातल्या कन्येचा डंका केरळमध्ये घुमणार आहे.

दृष्टीहीन असूनही यंदा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (यूपीएससी) देशात ७७३ व्या क्रमांक प्रांजल ने पटकावला होता. तिने राज्यशास्त्रामध्ये पदवी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधांविषयीचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठ गाठले. त्यानंतर एम. फिल पूर्ण केल्यानंतर खऱ्या अर्थाने यूपीएससीची तयारी सुरू केली होती. यासाठीचा सर्व अभ्यासक्रम ब्रेल लिपीत मिळणे हे तिच्यासाठी मोठे आव्हान होते. त्यामुळे टेक्नोलॉजीच्या जोरावर स्क्रीन रीडर वापरून तिने अभ्यास केल्याची माहिती एका रेडिओ वाहिनीशी बोलताना दिली होती. उल्हासनगरमधील शाळा-कॉलेज, दिल्लीतील जेएनयूमधील एम.ए. ते पीएचडी आणि आता यूपीएससी हा सगळाच प्रवास मला खूपच रोमांचक असल्याचे ती सांगते. महाराष्ट्राची कन्या प्रांजलला तिच्या कार्यासाठी शुभेच्छा.