कौतुकास्पद ! डोळ्यांनी पाहू शकत नाही ‘ही’ मुलगी, पास झाली UPSC ची परीक्षा

मदुराई : वृत्त संस्था – युपीएससीची परीक्षा किती अवघड असते, हे तुम्ही सर्वजण जाणताच. ती पास करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करावी लागते. आम्ही आज तुम्हाला एका अशा मुलीबाबत सांगणार आहोत, जी डोळ्यांनी पाहू शकत नाही, परंतु युपीएससी परीक्षा तिने पास करून 286 रँक मिळवली आहे. जाणून घेऊयात तिच्याबाबत…

25 वर्षांच्या या मुलीचे नाव पुरना सुंथरी आहे, जी तामिळनाडुची आहे. माजी क्रिकेटर मोहम्मद कैफने सोशल मीडियावर या मुलीची गोष्ट शेयर केली आहे. त्याने लिहिले आहे, अनेक अडचणींना तोंड दिल्यानंतर या मुलीने युपीएससीसारखी अवघड परीक्षा पास केली आहे.

पुरना सुंथरीचा युपीएससी परीक्षेचा हा चौथा प्रयत्न आहे. ज्यामध्ये ती यशस्वी झाली. एका मुलाखतीमध्ये सुंथरी म्हणाली, माझ्या आई-वडीलांनी मला खुप आधार दिला. मी माझे यश त्यांना समर्पित करते.

तिने म्हटले, मी या परीक्षेसाठी पाच वर्षे दिले आहेत, आज मी आणि माझे कुटुंब आनंदी आहे. अखेर माझी अनेक वर्षांची मेहनत यशस्वी झाली.

एका न्यूज वेबसाइटशी बोलताना सुंथरीने सांगितले, मी 11 वर्षांच्या वयात आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहू लागले. मी शिक्षण, आरोग्य आणि महिला सशक्तिकरण सारख्या क्षेत्रात सेवा करण्यास इच्छूक आहे.

तिने म्हटले, सिव्हिल सेवा 2019 च्या परीक्षेसाठी दिवसरात्र पुस्तके वाचली आणि ऑडिओ फॉर्मेटच्या माध्यमातून अनेक विषय समजून घेतले.

सिव्हिल सेवा परीक्षा देशातील सर्वात कठिण परीक्षांपैकी एक आहे. 1,000 पेक्षा कमी पदांसाठी 10 लाखांपेक्षा जास्त उमेदवार अर्ज करतात.