सांगली : विट्यात दुचाकी चोरणाऱ्या चौघांना अटक, 32 मोटारसायकली जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात दुचाकी चोरणार्‍या टोळीला अटक करण्यात आली आहे. या टोळीकडून 16 लाख रुपये किंमतीच्या 32 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यातील 4 चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. विटा पोलिसांनी ही कारवाई केली.

सचिन भोरे (वय 32 रा. उटगी), नामदेव बबन चुनाडे, औदुंबर रमेश उगाडे, गणेश महादेव साळुंखे (सर्व रा.अनिलनगर झोपडपट्टी ता.पंढरपूर, जि.सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या सुचनेनुसार मालमत्तेतील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विट्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी पथके तयार करुन गस्त सुरु केली होती.

बुधवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास नाकाबंदीवेळी खानापूर बस स्थानक समोर सचिन भोरे मोटरसायकलसह (एम.एच.10 सी.जे.3206) संशयितरित्या सापडला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. सखोल चौकशी केल्यावर सचिनने ही मोटरसायकल 1 महिन्यापूर्वी रेणावी येथून चोरल्याचे कबूल केले.

त्याला अटक करुन कसून तपास केला असता त्याने नामदेव चुनाडे, औदुंबर उगाडे, गणेश साळुंखे या साथीदारासह सांगली, सातारा, पुणे, सोलापूर या 4 जिल्ह्यामधून मोटारसायकल चोरी करुन त्या विक्री करत असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडील 15 लाख 80 हजाराच्या 31 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.