विठ्ठल महापुजेचा मान लातूरच्या ‘त्या’ दाम्पत्याला

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – गेली ३९ वर्षे सलग वारी करणाऱ्या  लातूरच्या प्रयाग आणि विठ्ठल मारुती चव्हाण (रा. सांगवी सुनेवाडी तांडा, ता. अहमदपूर जि. लातूर) या दाम्पत्यांना मुख्यंमंत्र्यांसमवेत महापुजेचा मान मिळाला आहे. विठ्ठल चव्हाण (वय ६१) हे सांगवी सुनेवाडी तांडाचे १० वर्षे सरपंच होते. १९८० पासून अर्थात ३९ वर्षांपासून ते सलग वारी करीत आहेत. सध्या ते तंटामुक्त समितीचे सदस्य आहेत.

त्यांना दोन मुले असून एक विवाहित मुलगी आहे. दोन्ही मुले पुणे येथे नोकरीस आहेत. ३९ वर्षापासूनची वारीची परंपरा, सलग वारी केल्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत पांडुरंगाची महापूजा करण्याचा मान मिळाला. त्यामुळे आनंद झाला असून आमच्या गावाकडील नातेवाईकांना याची माहिती दिली. त्यांनाही खूप आनंद झाला. आमची दोन्ही मुले पुण्यात खाजगी कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करतात.  आमची गावाकडे पाच एकर शेती आहे. बागायत शेती होती. मात्र दुष्काळामुळे कोणतीही पिके नाहीत. महाराष्ट्रातला दुष्काळ नाहीसा व्हावा भरपूर पाऊस पडावा हीच मागणी विठ्ठल चरणी केल्याचे चव्हाण दाम्पत्याने सांगितले.

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय पुजा करण्यात आली. मराठा आरक्षणावरुन गेल्या वर्षी फडणवीस यांना महापूजा करायला मराठा संघटनांनी विरोध केला होता. त्याच मराठा संघटनांनी यंदा त्यांचा सत्कार केला. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम कर. जनतेच्या मनातील मागणं पूर्ण होऊ देत असे सांगून माऊलीचे व जनतेचे आर्शिवाद मिळाले तर नक्की पुढील वर्षी महापुजेला येईन, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापूजेनंतर सांगितले.

Loading...
You might also like