विठ्ठलालाच तुमचे दर्शन नको असेल; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना चिमटा

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन-

आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा समाज आक्रमक झाल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आषाढी पूजेसाठी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय घेतला. यावरुन आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना खोटक टोला लगावला आहे. विठ्ठलालाच तुमचे दर्शन नको असेल, असे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटले आहे.
[amazon_link asins=’B014PHNRE4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8a78a941-8e63-11e8-9836-797768396711′]

राज ठाकरे सध्या मराठवाडा दाैऱ्यावर असून, सोमवारी त्यांनी परभणीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात थापा मारणारे मुख्यमंत्री असून, एवढे खोटारडे सरकार कधीच पाहिले नव्हते. आजपर्यंतच्या कालावधीतील केंद्र व राज्यातील सरकारे हे खोटी असल्याची टिका त्यांनी केली. राजकीय खेळात राज्यातील तरुणांची अडवणूक केली जात असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.

एवढेच नाहीतर महाराष्ट्राचा पैसा वापरून वेगळा विदर्भ करण्याचा त्यांचा डाव आहे. मुख्यमंत्र्यांनी नागपूर चांगले करावे, मात्र उर्वरित महाराष्ट्राचा विकास का करत नाहीत. असा आरोपही त्यांनी केला आहे. मराठवाड्याला अनेक मु्ख्यमंत्री मिळाले. परंतू या भागाचा अपेक्षित विकास होऊ शकला नाही, मराठवाड्याच्या दाैऱ्यानंतर आपण लवकरच विदर्भाच्या दाैऱ्यावर जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी पूजेसाठी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्र्यांना कोणीही रोखू शकत नाही. मात्र 10 लाख वारकऱ्यांच्या जिवाला धोका होईल असे प्रयत्न केले जात आहेत. यामुळे यावर्षी आषाढी पूजेसाठी पंढपूरला जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे सोमवारी विठ्ठलाची शासकीय पुजा वारकऱ्यांच्या हस्ते करण्यात आली.
जाहिरात