युवराज सिंगच्या वडिलांना वादग्रस्त विधान करणे पडले महागात

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याचे वडिल योगराज सिंग (yograj-singh) यांना हिंदू आणि हिंदू महिलांबद्दल केलेले वादग्रस्त विधान चांगलेच महागात पडले आहे. आक्षेपार्ह वक्तव्यानंतर योगराज यांनी माफी मागून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. आता तर दिग्दर्शकाने एका चित्रपटातून त्यांची हकालपट्टी केली आहे.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (vivek-agnihotri) यांच्या द काश्मीर फाईल्स (the kashmir files) या सिनेमात योगराज सिंग यांच्या वाट्याला एक महत्त्वपूर्ण भूमिका आली होती. या आठवड्यात या सिनेमाच्या पहिल्या शेड्यूलचे शूटींगही सुरु झाले. सिनेमात योगराज यांची वर्णी लागली होती. मात्र आता त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर विवेक अग्निहोत्री यांना त्यांना सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

अग्निहोत्री म्हणाले की, मी माझ्या द काश्मीर फाईल्स या सिनेमासाठी योगराज सिंह यांना एका महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी कास्ट केले होते. वादग्रस्त वक्तव्यांचा त्यांचा इतिहास मला ठाऊक होता. पण मी त्याकडे दुर्लक्ष केले होते. कला आणि कलाकाराचे व्यक्तिगत आयुष्य याची सरमिसळ मी करत नाही. कलाकाराला मी नेहमीच राजकारणापासून दूर ठेवतो. पण त्यांच्या वादग्रस्त भाषण ऐकल्यानंतर मला धक्का बसला. महिलांबद्दल कोणीही असे बोललेले मी सहन करू शकत नाही. जी व्यक्त धर्माच्या आधारावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्या व्यक्तीला मी माझ्या सिनेमासाठी निवडू शकत नाही. मी त्यांना याबद्दल कळवले आहे. आता ते माझ्या सिनेमात दिसणार नाहीत.

सध्या सोशल मीडियावर योगराज सिंग यांचे एक भाषण व्हायरल होत आहे. ते त्यामध्ये हिंदू महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसत आहे. यानंतर अनेकांनी त्यांच्या अटकेची मागणी झाली होती. ट्विटरवर सध्या ‘Arrest Yograj Singh’ हा हॅशटॅगही ट्रेंड झाला होता. या वादानंतर योगराज यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात माफी मागितली होती.अनेकदा तोंडातून काही गोष्टी निघतात. नेतेही अनेकदा असे काही बोलतात. मी जे काही बोललो त्यासाठी माफी मागतो, असे ते म्हणाले होते. पण त्याचा उपयोग झाला नाही.