अभिनेता विवेक ओबेरॉयच्या मेव्हण्यास कॉटन पेट ड्रग्ज प्रकरणात अटक

बेंगलुरु : येथील गाजत असलेल्या कॉटन पेट ड्रग्ज प्रकरणात (drugs case) फरार असलेल्या आदित्य अल्वा याला सोमवारी रात्री चेन्नई येथून केंद्रीय गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आदित्य अल्वा याच्याविरुद्ध सप्टेंबर २०२० मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरारी होता. बेंगलुरु पोलीस दलाचे सह पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी ही माहिती दिली. आदित्य अल्वा हा अभिनेते विवेक ओबेरॉय याचा मेव्हणा आणि कर्नाटकचे माजी राज्यमंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा आहे. याप्रकरणात कन्नडा अभिनेत्री रागिणी, संजना गलराणी यांना अटक केल्यापासून हे ड्रग्ज प्रकरण (drugs case) गाजत आहे.

कॉटनपेट ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली आहे. सप्टेंबर २०२० मध्ये हे प्रकरण उघडकीस आले होते. तेव्हापासून आदित्य अल्वा फरार होता. त्याच्याविरुद्ध देशभर लुकआऊट नोटीसही देण्यात आली होती.

तो चेन्नई मध्ये असल्याची माहिती मिळाल्यावर त्याचा पोलिसांनी शोध घेऊन अटक केली. त्याचा पासपोर्ट पोलिसांनी जप्त केला असून गुन्हा दाखल केल्यानंतर त्याने परदेशात प्रवास केला नसल्याचे पासपोर्टवरील नोंदीवरुन दिसून येत आहे.

बॉलीवूडमधील सिनेअभिनेते, अभिनेत्री यांच्या ड्रग्ज प्रकरणाचा तपास सुरु असतानाच केंद्रीय नाकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) कन्नड चित्रपट अभिनेता आणि गायकांना ड्रग्ज पुरवठा करणार्‍या केरळमधील तिघांना अटक केल्यानंतर हे प्रकरण उघड झाले होते. या कॉटनपेट ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रागिणी, संजना गलराणी, पार्टी संयोजक विरेन खन्ना, रियल्टर राहुल यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती. त्याचबरोबर अंमली पदार्थाच्या सेवनाशी संबंध असल्याने अनेक व्हीआयपी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात आदित्य अल्वा याचाही समावेश होता.