Vivo नं IPL सोबतचा मोडला करार, BCCI ला शोधवा लागणार नवा स्पॉन्सर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमिअर लीग होणार असल्यानं क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड आनंद संचारला आहे. मात्र, त्याचवेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) त्यांच्या रोषाचाही सामना करावा लागत आहे. गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. पण, त्याचवेळी त्यांनी Vivo हे टायटल स्पॉन्सर असतील, अशी केलेली घोषणा अनेकांना न पटणारी होती. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर आयपीएलवर बहिष्कार घाला, चिनी कंपनी Vivo वर बहिष्कार घाला असा ट्रेंड सुरु होता. पण, आता Vivo आयपीएलसोबतचा करार मोडला आहे.

मात्र, अद्याप बीसीसीआय आणि Vivo यांच्यापैकी कोणीही या वृत्ताला दुजोरा दिला नाही किंवा अधिकृत घोषणा केलेली नाही. Vivo ही चीनी कंपनी आहे आणि मागील 48 तासात सोशल मीडियावर आयपीएल आणि Vivo यांना ट्रोल केले जात आहे. भारत-चीन सिमेवरील वाढत्या तणावामुळे चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यात यावा अशी मागणी जोर धरताना बीसीसीआयनं Vivo शी करार कायम ठेवल्यानंतर जोरदार टीका झाली. भारत सरकारनं चिनी अॅपवर बंदी घातली आहे. बीसीसीआयनं आता हा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे.

Vivo India ने 2017 मध्ये 2199 कोटींत आयपीएलचे टायटल स्पॉन्सर हक्क मिळवले होते. त्यानुसार आयपीएलला एक वर्षात Vivo कडून 440 कोटी मिळतात. यापूर्वी पेप्सिको ही आयपीएलची टायटल स्पॉन्सर होते आणि त्यांनी 2016 मध्ये 396 कोटी रुपये दिले होते. Vivo ची तीन वर्षाचा करार अजूनही शिल्लक आहे. त्यानुसार 2021, 2022 ला Vivo पुन्हा आयपीएलचे टायटल स्पॉन्सर म्हणून परतणार आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली व सचिन जय शाह यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावर्षी Vivo टायटल स्पॉन्सर नसल्याची शक्यता अधिक आहे, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले.