’महिला सफाई कर्मचार्‍याशी पुतिन यांचे संबंध, आता कोट्यवधीची मालकीन’: रशियन मीडिया

मॉस्को : रशियन मीडिया Proekt च्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे एका महिला सफाई कर्मचार्‍याशी संबंध होते. आता ही महिला 700 कोटी रूपयांपेक्षा जास्तीची मालकीन झाली आहे. मात्र, स्वतंत्र प्रकारे या रिपोर्टला दुजोरा मिळालेला नाही. पुतिन यांच्या प्रवक्त्याने हे आरोप फेटाळले आहेत.

मीडियाच्या रिपोर्टनुसार, सफाई कर्मचार्‍यासोबत पुतिन यांच्या संबंधातून एका मुलीचा सुद्धा जन्म झाला. आता ती 17 वर्षांची झाली आहे. हा रिपोर्ट द मॉस्को टाइम्सने सुद्धा प्रकाशित केला आहे.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 68 वर्षाच्या पुतिन यांचे संबंध स्वेतलाना क्रिव्होनोगिख नावाच्या महिलेशी होते. आता ही महिला रशियाच्या सेंट पीर्ट्सबर्गच्या पॉश परिसरात राहते, जो पुतिन यांच्या निकटवर्तीयांसाठी सुरक्षित मानला जातो.

रशियन मीडियाने 17 वर्षांची एलिजावेटा क्रिव्होनोगिखला पुतिन यांची सीक्रेट मुलगी म्हटले आहे. अल्पवयीन असल्याने एलिजावेटाचा चेहरा ब्लर करून फोटो प्रकाशित करण्यात आला आहे. तर, या मीडियाने फेस रेकग्निशन एक्सपर्टच्या संदर्भाने म्हटले आहे की, पुतिन आणि त्यांच्या मुलीचा चेहरा एकमेकांशी 70 टक्के जुळतो.

ब्रिटनच्या ब्रॅडफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये व्हिज्युअल कम्पुटींग सेंटरचे डायरेक्टर प्रोफेसर हसन उगैल यांनी म्हटले की, पुतिन आणि त्यांच्या कथित मुलीचा चेहरा इतका जास्त जुळतो, यासाठी निष्कर्षवर पोहचता येते की, दोघांचा एकमेकांशी संबंध आहे.

रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, एलिजावेटाचा जन्म 2003 मध्ये झाला होता. मात्र, तेव्हा पुतिन ल्यूडमिला शक्रेबनेव्हा सोबत विवाहित होते. नंतर दोघांचा घटस्फोट झाला होता. या वृत्तात दावा करण्यात आला आहे की, एलिजावेटाच्या जन्माच्या कागदपत्रांवर पित्याचे नाव नाही, फक्त व्लादिमिरोव्हना लिहिले आहे. कथित प्रकारे एलिजावेटा बदललेल्या नावाने अनेक वर्षांपासून राहात आहे. एलिजावेटाची आई स्वेतलाना क्रिव्होनोगिखचे वय 45 वर्षे आहे. ती अगोदरपासून सफाई कर्मचारी म्हणून काम करत होती. नंतर एका कंपनीची मालकीन झाली. या कंपनीशी पुतिन यांचाही संबंध आहे.

रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, फ्लाईट्स डेटावरून समजते की, स्वेतलाना क्रिव्होनोगिख त्या फ्लाईट्समधून प्रवास करत होती, ज्यामधून पुतिन सुद्धा प्रवास करत असायचे. ही कथित रिलेशनशिप मागील दशकाच्या शेवटी तुटली. सूत्रांच्या माहितीनुसार या नात्याबद्दल वाच्यता करण्यास तिला नकार देण्यात आला आहे. रिपोर्टरने जेव्हा एलिजावेटाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने ताबडतोब सोशल मीडियावरून आपले फोटो हटवले.

You might also like