2036 पर्यंत रशियाचे राष्ट्रपती राहतील व्लादिमीर पुतिन ! सार्वमतामध्ये मिळाले ‘बंपर’ वोट

मॉस्को : रशियाच्या राष्ट्रपती पदावर व्लादिमीर पुतिन यांनी 2036 पर्यंत कायम राहण्यासाठी मतदारांनी संविधानात दुरूस्ती करण्यास मंजूरी दिली आहे. यासाठी आठवडाभर चाललेले सार्वमताचे काम बुधवारी पूर्ण झाले. यामुळे पुतिन यांचा आणखी 16 वर्ष राष्ट्रपती पदावर बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, अनेक मीडिया रिपोर्टमध्ये सार्वमतादरम्यान लोकांवर दबाव आणणे आणि अनियमितता केल्याचे गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. सार्वमतात भाग घेणार्‍या सुमारे 77 टक्के लोकांनी संविधान दुरूस्तीच्या बाजूने मतदान केल्याचा दावा करण्यात आला आहे.

एक आठवडा चालली मतदान प्रक्रिया
संविधान दुरूस्ती कायद्याद्वारे पुतिन यांचा सध्याचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना सहा वर्षांचा अतिरिक्त कालावधी मिळणार आहे. कोरोना व्हायरस महामारीमुळे गर्दी कमी ठेवण्यासाठी प्रथमच रशियात मतदान प्रक्रिया एक आठवडा चालली आहे. संविधानात करण्यात आलेल्या दुरूस्तीसाठी जनतेला विश्वासात घेण्यासाठी पुतिन यांनी मोठ्या स्तरावर अभियान राबवले होते.

परंतु, हे सार्वमत पुतिन यांची सत्ता कायम राहावी, या हेतून हे सार्वमत घेतले जात आहे. यासाठी मतदान करण्यासाठी वापरण्यात आलेली पारंपारिक पद्धती आणि तिची वैधता संशयास्पद असल्याने त्यांची प्रतिमा खराब होऊ लागली आहे. राजकीय विश्लेषक आणि क्रेमलिनचे माजी राजकीय सल्लागार ग्लेब पाव्लोव्स्की यांनी म्हटले की, कोरोना व्हरयरस संसर्गाच्या धोक्याचा फायदा घेऊन आणि या धोक्याकडे दुर्लक्ष करून मतदान घेणे, हे पुतिन यांची कमजोरी दर्शवते.

पुतिन यांच्यावर निकटवर्तीयांचाही विश्वास नाही

पाव्लोव्स्की यांनी म्हटले की, पुतिन यांच्यावर निकटवर्तीयांचा सुद्धा विश्वास नाही. त्यामुळे ते चिंताग्रस्त आहेत की भविष्यात काय होईल. त्यांना या गोष्टीचा ठोस पुरावा हवाय की जनता त्यांच्या समर्थनात आहे. मतदानाची प्रक्रिया समाप्त होताच सध्याच्या गोपनीय आणि हैराण करणार्‍या वातावरणाला ही विराम मिळेल, ज्याची सुरूवात जानेवारीमध्ये पुतीन यांनी दिलेल्या भाषणाने झाली होती. ज्यामध्ये त्यांनी संविधान दुरूस्तीचा प्रस्ताव प्रथमच मांडला होता.