काय सांगता ! होय, चक्क मतदान कार्डावर मतदाराऐवजी छापला कुत्र्याचा फोटो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्हाला कसे वाटेल जेव्हा तुमच्या एखाद्या ओळखपत्रावर आपले नाव, पत्ता सर्व काही बरोबर नमूद केले असेल मात्र आपल्या फोटोच्या जागी एखाद्या प्राण्याचा फोटो लावला असेल. असे पश्चिम बंगालच्या एका व्यक्तीसोबत झाले आहे. या व्यक्तीच्या मतदान कार्डावर कुत्र्याचा फोटो छापला आहे. हे प्रकरण पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादच्या रामनगर गावचे आहे. कुत्र्याचा फोटो ज्याच्या ओळखपत्रावर आहे त्या व्यक्तीचे नाव सुनील करमाकर असे आहे.

सुनील करमाकर यांचे म्हणणे आहे की ते भारतीय निवडणूक आयोगाच्या विरुद्ध याबाबतीत मानहानीची केस दाखल करणार आहेत. तसेच ते म्हणाले की, माझ्या मतदान कार्डमध्ये काही चुका असल्याकारणाने त्या सुधारण्यासाठी मी अर्ज केला होता. परंतु जेव्हा मतदान कार्ड आले तेव्हा त्याच्यावर माझ्या ऐवजी कुत्र्याचा फोटो लावला होता.

सुनील करमाकर यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी ही चूक जाणूनबुजून केली आहे. यामुळे सार्वजनिकरित्या माझा अपमान करण्यात आला आहे. माझी चेष्टा केली जात आहे. आता मी हे प्रकरण न्यायालयात घेऊन जाईन.

जेव्हा निवडणूक आयोगाने या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा तेथील एका अधिकाऱ्याने सांगितले की ही चूक कशी झाली हे अद्याप समोर आलेले नाही. सध्या सुनील करमाकरच्या मतदान कार्डात सुधारणा केली जात आहे.

असे सांगण्यात येत आहे की ही चुक राष्ट्रीय नागरिक नोंदणीमूळे होत असल्याचे बोलले जात आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील २२ विधानसभा मतदार संघातील २.५० लाखांपेक्षा जास्त नवीन मतदारांसह ८.३० लाखाहून अधिक लोकांनी चुकांच्या दुरुस्तीसाठी अर्ज केले आहेत. यासाठी जिल्ह्यातील सर्व सरकारी कर्मचारी काम करत आहेत. यांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत कारण चुका सुधारण्यात कोणतीही चूक होऊ नये.