मतदान ओखळपत्र (Voter ID) ‘नागरिकत्व’ सिध्द करण्यासाठी पुरेसा ‘पुरावा’, न्यायालयानं केलं ‘मान्य’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘नागरिकत्व मिळविण्यासाठी मतदार ओळखपत्र पुरेसा पुरावा आहे.’ असे म्हणत मुंबईचे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी बांगलादेशी घुसखोराचा आरोप असलेल्या जोडप्याची निर्दोष सुटका केली. कोर्टाने हे मान्य केले की, मतदार ओळखपत्र हे कोणत्याही नागरिकाचे नागरिकत्व मिळविण्याचे प्रमाणपत्र आहे. दरम्यान, या जोडप्यास 2017 मध्ये बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याबद्दल आणि कोणत्याही कागदपत्रांविना मुंबईत वास्तव्य केल्याबद्दल अटक करण्यात आली होती.

कोर्टाने या प्रकरणातून या जोडप्याला निर्दोष सोडले आणि म्हटले की, ‘जन्म प्रमाणपत्र, राहण्याचा दाखला, मूळ रहिवासी प्रमाणपत्र आणि पासपोर्ट मूळ पुरावा मानला जाऊ शकतो.’ न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की मतदार ओळखपत्र देखील नागरिकतेचा पुरेसा पुरावा आहे. ते म्हणाले की, लोकप्रतिनिधी कायद्याच्या फॉर्म 6 नुसार मतदार ओळखपत्र तयार करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला तो नागरिक असल्याचा जाहीरनामा दाखल करावा लागतो. जर ही घोषणा चुकीची असल्याचे आढळले तर त्याला शिक्षा होऊ शकते.

अब्बास शेख (45) आणि राबिया खातून शेख (40) यांनी आपले नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी मतदार ओळखपत्रसह इतर मुख्य कागदपत्र देखील सादर केले. परंतु, या दाम्पत्याने सादर केलेली सर्व कागदपत्रे चुकीची असल्याचा दावा फिर्यादींनी केला आहे. या दाम्पत्याकडे ठेवलेली कागदपत्रे बनावट होती हे सिद्ध करण्यास फिर्यादीला यश आले नाही. कोर्टाने आपला निकाल देताना म्हटले आहे की आरोपींनी सादर केलेली कागदपत्रे अस्सल नाहीत हे सिद्ध करण्यात फिर्यादी खटला अपयशी ठरला आहे.

कोर्टाने ही कागदपत्रे स्वीकारण्यास नकार दिला
आधार कागदपत्र, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रेशनकार्ड हे एखाद्या व्यक्तीचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुरेशी कागदपत्रे मानली जाऊ शकत नाहीत, असे नमूद केले. कारण ती कागदपत्रे नागरिकांत सिद्ध करण्याच्या उद्देशाने बनवली गेली नाहीत. ते म्हणाले की जन्माचा दाखला, राहण्याचे प्रमाणपत्र आणि पासपोर्ट इत्यादी कागदपत्रांद्वारे कोणत्याही व्यक्तीचे मूळ स्थापित करण्यासाठी विश्वास ठेवला जाऊ शकतो.