परभणीत ४ विधानसभा मतदारसंघांची सेनेला साथ, सातव्यांदा सेनेचा विजय

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय उर्फ बंडू जाधव आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यात काटे की टक्कर झाली. त्यात संजय जाधव उर्फ बंडू बॉस यांना सेनेचा गड राखता आला. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेश विटेकर यांना शिवसेनेच्या या गडाला खिंडार पाडता आले नाही.

परभणी लोकसभा मतदारसंघ पारंपारिकरित्या शिवसेनेचा गड मानला जातो. परभणीत शिवसेनेच्या उमेदवारांनी आपली टर्म संपली की नंतर जय महाराष्ट्र करण्याचा जणू पायंडाच आहे. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले तुकाराम रेंगे पाटील असोत की गणेश दुधगावकर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. परंतु शिवसेनेने विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांना उमेदवारी दिली. ती पक्षांतर न करण्याची शपथ देऊनच त्यांना उमेदवारी दिली. परंतु शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने येथे तेवढाच तगडा आणि आव्हान निर्माण करणारा उमेदवार दिला. त्यामुळे शिवसेनेचे संजय जाधव आणि राजेश विटेकर यांच्यात चुरस रंगली.

संजय जाधव यांना त्यांचे कार्यकर्ते बंडू बॉस तर विटेकर यांचे कार्यकर्ते दादा या नावाने संबोधतात. १८ ते ३० वयोगटातील कार्यकर्त्यांना बंडू बॉसचं आकर्षण आहे. तर बंडू जाधव तसे अनुभवी परंतु राजेश विटेकर थोडे नवखे आहेत. याचा मतदारांनी विचार केला. तर एमआयएमच्या आलमगीर खान यांच् वंचित बहुजन आघाडीच्या वतीने झालेल्या एन्ट्रीने परभणीत खान की बाण असाही प्रचार बघावयास मिळाला. परंतु अंतर्गत गटबाजीचा फटका दोन्ही पक्षांना बसला आहे. शिवसेनेत राहूल पाटील आणि संजय जाधव यांच्यातील मतभेदांमुळे चर्चा रंगली होती. परंतु कार्यकर्त्यांना त्यांनी एकत्र येऊन काम करावं असं वाटत होतं.

चार विधानसभा मतदारसंघांत सेनेला साथ

परभणी मतदारसंघात जालन्याचे २, परभणीचे ४ असे ६ विधानसभा मतदार संघ आहेत. यातील जिंतून घनसावंगी, गंगाखेड हे तीन मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत. तर शिवसेना, भाजप आणि अपक्ष यांच्याकडे प्रत्येकी एक मतदारसंघ आहे. परंतु संजय जाधव यांना वंचित फॅक्टरचाही फायदा झाला. तर सुरुवातीपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असलेला या मतदारसंघात शिवसेनेच्या गडाला खिंडार पाडण्याचे आव्हान राजेश विटेकर यांच्यावर होते. परंतु ते अयशस्वी झाले.

विजयी उमेदवार – संजय उर्फ बंडू जाधव (शिवसेना) – ५८३२१४

पराभूत – राजेश विटेकर – (राष्ट्रवादी कॉंग्रेस) – ४९६३७२, आलमगीर मोहम्मद खान (वंचित बहुजन आघाडी) – १४९८३४

एकूण उमेदवार – १७

विधासभनिहाय मतदान

मतदारसंघ शिवसेना राष्ट्रवादी वंचित

परभणी ६६,१०३७ ९६,३५४ २१,३५५

जिंतूर १,०३,२४७ ७९,२९० २६,०७९

गंगाखेड १,१३,२०५ ८४,७३० ३२,८०६

परतूर ७९,६३६ ६०,९१४ २१,७००

घनसावंगी ९०,३९५ ६६,१०३ २१,०८५

पाथरी ८५,५९४ १,०८,९८१ २६,८२९

परभणीतील एकूण मतदार – १९ लाख ८३ हजार ९०३

पुरुष मतदार – १० लाख ३२ हजार ८५५

महिला मतदार – ९ लाख ६१ हजार ८३३

परभणीत झालेले मतदान – १२ लाख ५३ हजार ६१२