काँग्रेसच्या मंत्र्याचे शॉकिंग विधान, हाताशिवाय दुसरं बटण दाबल्यास…

रायपूर : वृत्तसंस्था – निवडणूक प्रचारादरम्यान नेत्यांकडून आणि मंत्र्याकडून दर्जा सोडून टीका करण्यासोबतच मतदारांना धमकी देण्याचे प्रकार घडत आहेत. निवडणूक आयोग अशा घटनांची गंभीरतेने दखल घेत आहे. छत्तीसगड सरकारमधील मंत्री कवासी लखमा यांनी मतदारांना भीती घालताना, जर काँग्रेसशिवाय इतर कोणतेही बटन दाबले, तर तुम्हाला इलेक्ट्रीक शॉक बसेल असे म्हटले. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारालाच मतदान करा असे आवाहन लखमा यांनी केले. त्यामुळे मतदारांना धमकी देऊन भीती घातल्याबद्दल लखमा यांना आयोगाने नोटीस बजावली.

काँग्रेसचे लोकसभा उमेदवार बिरेश ठाकूर यांना मतदान करण्याचे आवाहन लखमा यांनी कनकेर येथील मतदारांना केले होते. बिरेश ठाकूर यांचे बटण पहिल्या क्रमांकाचे आहे. त्यामुळे पहिल्या क्रमांकाचे बटण दाबा, जर दुसऱ्या क्रमांकाचे बटण दाबले तर तुम्हाला इलेक्ट्रीक करंट बसेल, अशी भीती त्यांनी मतदारांना घातली. केवता येथील एका सभेला संबोधित करताना लखमा यांनी जनसमुदायाला काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

निवडणूक आयोगाने लखमा यांना नोटीस बजावली असून याप्रकरणी तीन दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. तेथील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विक्रम उसेंडी यांनी लखमा यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला असून मंत्रीमहोदयांकडून मतदारांची दिशाभूल करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. लखमा यांच्याकडून आदर्श आचारसंहितेचाही भंग झाल्याचे उसेंडी यांनी म्हटले होते. दरम्यान, गुरुवार (दि.१८ एप्रिल) कनकेर मतदारसंघात मतदान होत आहे.