मतदारांनो, आपण सुळेंना हरवु शकता ; पुरंदर तालुक्यात शिवसैनिकांची नवीन मोहीम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुरंदर तालुक्यात शिवसैनिकांनी ‘मतदारांनो, आपण सुळेंना हरवु शकता’ या नावाने अनोखी मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेची तालुक्यात सर्वत्र चर्चा सुरु असून सोशल मिडीयावर मोहिमेने भलताच जोर धरला आहे. भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना विजयी करून बारामती लोकसभा मतदारसंघात परिवर्तन घडवण्याच्या दृष्टीने ही मोहीम राबवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच महायुतीच्या एका बैठकीत राज्यमंत्री विजय शिवतारे यांनीही या संकल्पनेचे सुतोवाच केले होते.

सन २००९ मध्ये पहिल्यांदा पुरंदरमधून शिवसेनेचा आमदार झाल्यानंतर सुळे आणि शिवतारे यांच्यातला संघर्ष पुणे जिल्ह्याने पाहिला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत फुरसुंगी कचरा डेपोच्या मुद्द्यावरून पहिल्यांदा भडका उडाला. आयुक्तांना शिवतारेंनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आयुक्तांनीच देणं अपेक्षित असतांना सुळे यांनी हस्तक्षेप केला. त्याचे रुपांतर वादावादीत झाले. शिवतारे यांच्याकडे रोखून पाहत ‘यु विल हॅव टू पे हेवी प्राईस फॉर धिस’ (म्हणजे – तुम्हाला याची मोठी किंमत मोजावी लागेल) अशा शब्दात सुळे यांनी शिवतारे यांना सुनावले. त्यावर शिवतारे यांनीही अस्खलित इंग्रजीत ‘आय अॅम रेडी फॉर एनीथिंग’ अशा शब्दात बाणेदार उत्तर दिले.

सन २०१४ मध्ये शिवतारे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी लोकसभेच्या मैदानातच लढण्याचा चंग बांधला. मात्र रासपच्या महादेव जानकरांना उमेदवारी मिळाल्यामुळे शिवतारेंचा नाईलाज झाला. सुळे थोडक्यात बचावल्या. मात्र यंदा कसलीच कसर ठेवण्यास पुरंदर तयार नसल्याचे दिसते. स्थानिक राजकारणात आणि अनेक विकास प्रकल्पात शिवतारे यांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्याचे उट्टे काढण्यासाठी पुरंदरमधील शिवसैनिक आणि महायुतीचे कार्यकर्ते आसुसलेले असल्याचे पाहायला मिळते. शिवतारे यांच्या भाषणांना टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात तुफान प्रतिसाद देत लोकांनी आता ही मोहीम उचलून धरली आहे.

काय आहे या संकल्पनेची नेमकी पार्श्वभूमी ?

स्वातंत्र्योत्तर काळात स.का. पाटील हे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट आणि पंडित नेहरूंचे उजवे हात म्हणून ओळखले जात. त्यांच्या समोर निवडणूक लढणे म्हणजे वाघाच्या तोंडी शेळी देण्यासारखे होते. आपल्याला कोणीच हरवू शकत नाही अशी दर्पोक्ती पाटलांनी केली होती. १९६७ साली कामगार नेता असलेल्या जॉर्ज फर्नांडीस यांनी हे शिवधनुष्य उचलले आणि प्रचाराची सुरवातच ‘आपण स.का.पाटलांना हरवू शकता’ या मथळ्याखाली केली. मुंबईतील चाळी, गल्ल्या, मोहल्ले, रेल्वे स्थानके, बाजारपेठा अगदी सार्वजनिक शौचालयाच्या बाहेरही असे एकाच ओळीचे प्रचारफलक लावले. त्यामुळे सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढला आणि बघता बघता हा ज्वर इतका चढला की त्यात स.का पाटील पराभूत तर झालेच पण त्यांनी राजकारणातूनही संन्यास घेतला.

आज सुळे यांनी नेमके कोलीत शिवतारे यांच्या हातात दिले आहे. केडगाव येथील सभेत बोलताना ‘बारामतीकडे वाकड्या नजरेने बघू नका, बारामती आमची आहे’ अशी दर्पोक्ती सुळेंनी केली. त्याचाच संदर्भ पकडत आता पुरंदरमधील शिवसैनिकांनी ‘मतदारांनो, आपण सुळेंना हरवु शकतो’ असे आवाहन सहाही तालुक्यातील जनतेला केले आहे. वास्तविक शिवतारे बारामतीत लढल्यास हे अस्त्र शिवतारे यांच्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी राखून ठेवले होते. परंतु आता सुळे यांनीच स.का. पाटलांना शोभेल असे विधान केल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ही दुधारी तलवार बाहेर काढली आहे.

Loading...
You might also like