पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या असून राज्यामध्ये चार टप्प्यात मतदान होणार आहे. ११ एप्रीलला ७ मतदार संघात, १८ एप्रिलला १०, २३ एप्रिलला १४ आणि २९ एप्रिलला १७ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात ८ कोटी ७३ लाख मतदार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून, सदस्यसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षासाठी महाराष्ट्र हे महत्वाचे राज्य आहे. पहिल्या टप्प्यासाठी ७ दिवसांत उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. उल्लेखनीय म्हणजे २०१४ च्या तुलनेत यंदा महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे.
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकांचे वेळापत्रक :-
मतदानाच्या ताऱखा आणि त्यापुढील कंसात मतदारसंघाची नावे पुढील प्रमाणे आहेत.
पहिला टप्पा- ११ एप्रिलला ७ जागांसाठी मतदान होणार आहे. (मतदारसंघांची नावे – वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर आणि यवतमाळ- वाशिम)
दुसरा टप्पा – १८ एप्रिलला १० जागांसाठी मतदान होणार आहे. (मतदारसंघांची नावे – बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर)
तिसरा टप्पा – २३ एप्रिलला १४ जागांसाठी मतदान होणार आहे. (जळगांव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदु्र्ग, कोल्हापूर, हातकणंगले)
चौथा टप्पा – २९ एप्रिलला १७ जागांसाठी मतदान होणार आहे. (मतदारसंघांची नावे – नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरुर, शिर्डी)
#Loksabha Election 2019 : पुणे, बारामती २३ एप्रिलला तर मावळ, शिरुर २९ एप्रिलला मतदान