रमजानच्या कालावधीत मतदानाची वेळ बदलणार ?

सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला योग्य निर्णय घेण्याचे दिले निर्देश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रमजानच्या कालावधीत मतदानाची प्रक्रिया सकाळी सात ऐवजी पाच वाजता सुरु करावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यावर निवडणूक आयोगाने यासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे त्यामुळे रमजानच्या काळात मतदानाची वेळ निवडणूक आयोग बदलणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

देशभरात १७ व्या लोकसभेसाठी निवडणुकीचे चार टप्पे पार पडले असून तीन टप्पे बाकी आहेत. ६, १२ आणि १९ मे रोजी उर्वरित तीन टप्प्यांमधील मतदान होणार आहे. या कालावधीत रमजानचा महिना येत आहे. यंदा ५ किंवा ६ मेपासून रमजानला सुरुवात होणार आहे. त्यामुळे रमजानच्या कालावधीत मतदानाची प्रक्रिया सकाळी सात ऐवजी पाच वाजता सुरु करावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती. या याचिकांवर गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या जनहित याचिकांवरील सुनावणीदरम्यान “निवडणूक आयोगाने यासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा”, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

निवडणूक तारखांवर आक्षेप –

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर या निवडणूक तारखा रमजान महिन्यात येत असल्याने तृणमूल काँग्रेसने आक्षेप घेतला होता. निवडणूक तारखांना विरोध करताना तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हकीम म्हणाले होते की , ‘ निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताना रमजान महिन्याचा विचार केंद्रीय निवडणूक आयोगाने करणं गरजेचे होते. रमजानचा रोजा सुरु होणाऱ्या असल्याने मतदान टक्केवारीवर याचा परिणाम होऊ शकतो. रमजानचा रोजा ठेवून मुस्लिम मतदारांना मतदान करणे शक्य होणार नाही. ६ मे, १२ मे आणि १९ मे रोजी होणाऱ्या मतदानावर रमजानचा परिणाम होईल. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे.

तसेच लखनऊ येथील इस्लाम अभ्यासक मौलाना खालिद रशीद यांनीही निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणुकीच्या तारखांवर आक्षेप घेत मुस्लिम समुदायाच्या भावना लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने रमजान महिन्यात होणाऱ्या मतदान तारखा बदलण्याची मागणी केली होती.