योगासनाचा ‘अश्लील’ व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर करणारा शिक्षक ‘निलंबित’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपला योगासनाचा व्हिडिओ शिक्षकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकणाऱ्या शिक्षकाला निलंबित करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेकडून आपल्या शिक्षकावर ही कारवाई करण्यात आली. रामदेव बाबा प्रमाणे हा शिक्षक छोटसं धोतर नेसून योगासन करत होता, त्याचा त्याने जो व्हिडिओ तयार केला होता तो त्याने शिक्षकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर केला. या ग्रुपमध्ये महिला शिक्षिका देखील आहेत. या महिला शिक्षकांनी या व्हिडिओवर आक्षेप घेतला. हा आक्षेप फक्त योगासनाच्या व्हिडिओवर नसून हा शिक्षक अनेक अश्लील व्हिडिओ या ग्रुपवर शेअर करत असे.

या शिक्षकाला अनेकदा तंबी देण्यात आली होती. परंतु आंबट शौकिन व्हिडिओ या ग्रुपवर शेअर करणं त्याने थांबवलं नाही. त्यानंतर शिक्षकांनी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्याकडे तक्रार केली. मंगेश सातमकर यांनी शिक्षण विभागाला या शिक्षकांवर कारवाई करण्याची विनंती केली. परंतु दोनवेळा तक्रार करुनही पालिकेच्या शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला नाही.

अखेर विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न शिक्षण समितीपुढे उपस्थित झाला तेव्हा सातमकरांनी हा विषय शिक्षण समिती सभेत उपस्थित केला. तेव्हा शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी संबंधित शिक्षकाला चौकशी होईपर्यंत निलंबित करण्याचे आदेश दिले. अंजली नाईक यांना माहिती दिली की त्यावर कारवाई करत पालिका शिक्षण विभागाने या शिक्षकाला निलंबित केले आहे. चौकशी झाल्यानंतर या तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधित व्यक्तीला नोकरीमधून बडतर्फ केले जाई.

तसेच या शिक्षकावर यापूर्वी असे वर्तन करण्याचे आरोप आहेत त्याचीही तपासणी केली जाईल. विशेष म्हणजे हा मुद्दा शिक्षण समितीपुढे मांडणाऱ्या नगरसेवक मंगेश सातमकर यांनी विद्यार्थ्यांकडून या शिक्षकांविषयी अशी कुठलीही तक्रार आली नसल्याचे सांगितले. व्यक्ती निवृत्तीच्या जवळ आली असून कदाचित या व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा संशय नगरसेवकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या काळात अशा काही गोष्टी घडू नये असा संदेश शिक्षकांमध्ये जाण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –