अवघं ९ रुपये उत्पन्न असलेला ‘हा’ उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकरांना देणार टक्कर

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – निवडणूकीचा उमेदवार म्हटलं की, एक महागडी कार आणि वारेमाप संपत्ती असणारी व्यक्ती डोळ्यासमोर येते. त्यांच्याकडे पाहता त्यांच्या उत्पन्नाविषयी आपल्याला अंदाजही लावता येत नाही. तुम्ही कधी ९ रुपये उत्पन्न असलेला उमेदवार पाहिला आहे का ? कारण सध्या सोलापुरात ९ रुपये उत्पन्न असलेला एक उमेदवार चर्चेचा विषय ठरला आहे. व्यंकटेश्वर महास्वामी असं या उमेदवारांचं नाव असून ते हिंदूस्थान जनता पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत.

व्यंकटेश्वर महास्वामी यांच्यामुळे सोलापूर चर्चेत येण्यात भर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर या मोठ्या नेत्यांमुळे सोलापूर मतदारसंघ आधीच चर्चेत होता. परंतु, आता आणखी एका गोष्टीमुळे सोलापूर मतदारसंघ चर्चेत असल्याचे दिसत आहेत. व्यंकटेश्वर महास्वामी उर्फ दीपक कटकधोंड यांच्यामुळे चर्चेत भर पडल्याचे दिसत आहे.

व्यंकटेश्वर यांनी घेतले डिपॉझिट रक्कम जमा करण्यासाठी ४५ हजार रुपयांचे कर्ज

व्यंकटेश्वर महास्वामी यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. व्यंकटेश्वर महास्वामी यांनी निवडणूक आयोगाला जे प्रतिज्ञापत्र दिले आहे त्यात त्यांनी अवघं ९ रुपये उत्पन्न दाखवलं आहे. इतकेच नाही तर, त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची डिपाॅझिट रक्कम जमा करण्यासाठी ४५ हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचे सांगतिले आहे. निवडणूक लढवणाऱ्या आरक्षित उमेदवाराला १२ हजार ५०० रुपये डिपॉझिट जमा करावं लागतं, तर खुल्या गटातील उमेदवाराला २५ हजारांचं डिपॉझिट जमा करावं लागतं.

कोण आहेत व्यंकटेश्वर महास्वामी ?

व्यंकटेश्वर महास्वामी हे ३१ वर्षीय असून त्यांनी धारवाड विद्यापीठातून बी.कॉमची पदवी घेतली आहे. व्यंकटेश्वर यांच्या नावावर कोणत्याही प्रकारची जंगम अथवा स्थावर मालमत्ता नाही. तसेच त्यांच्यावर कुणीही अवलंबून नाही, असं त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. शिवाय व्यंकटेश्वर महास्वामी यांचा कर्नाटकातील नागठाण विधानसभा मतदारसंघातील मतरदार यादीत समावेश आहे.

व्यकंटेश्वर महास्वामी हे महाराष्ट्रातून जरी पहिल्यांदा निवडणूक लढवत असले तरी यापूर्वी त्यांनी विविध निवडणूकांत उमेदवारी अर्ज भरले आहेत. सोलापूर वगळता विजयापूर येथूनही ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे एकीकडे कोट्यधीश उमेदवार निवडणूक रिंगणात असताना केवळ ९ रुपये हाती आणि ४५ हजार रुपयांचे कर्ज घेतलेले महास्वामी रिंगणात कितपत टिकाव धरुन राहतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे हे मात्र नक्की.