वडगाव मावळमधील महिला तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हक्‍कसोड पत्राव्दारे मिळालेली शेतजमीन 7/12 पत्रकी नोंद करण्यासाठी 5 हजार रूपयाची लाच घेणार्‍या महिला तलाठी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरूवारी दुपारी रंगेहाथ पकडले आहे. महिला तलाठयाला 5 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यामुळे वडगाव मावळमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

सुजाता गोविंद रच्चेवार (28, तलाठी सज्जा निगडे, ता. मावळ, जि. पुणे) असे लाच घेणार्‍या महिला तलाठयाचे नाव आहे. याप्रकरणी एका 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार ज्येष्ठ नागरिकास हक्‍कसोड पत्राव्दारे मिळालेली शेतजमीन 7/12 पत्रकी नोंद करून हवी होती. त्यासाठी महिला तलाठी रच्चेवार यांनी त्यांच्याकडे 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार नोंदविली.

एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर गुरूवारी दुपारी सापळा रचण्यात आला. रच्चेवार यांनी सरकारी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून 5 हजार रूपयाची लाच स्विकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. रच्चेवार यांच्याविरूध्द वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक्षक संदीप दिवाण, उपाधिक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांनी ही कारवाई केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अर्चना बोदडे करीत आहेत. महिला तलाठयास 5 हजाराची लाच घेताना अटक केल्याचे संपुर्ण मावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.

जाहिरात