Lockdown : वाधवान बंधूंसह 21 जणांना पोलीस बंदोबस्तात पाचगणीहून महाबळेश्वरला हलवलं

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –  दिवाणी हाऊसिंग फायनान्स लि.चे प्रोमोटर्स आणि YES BANK घोटाळ्याील आरोपी असलेले कपील आणि धीरज वाधवान बंधूंच्या अडचणीत आणखी वाढण होण्याची शक्यता आहे. वाधवान बंधू आणि त्यांच्यासोबत आलेल्या 21 जणांना पाचगणी येथून महाबळेश्वरला हलवण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कोरोनाच्या संकटादरम्यान महाबळेश्वरला आल्याचे समोर आल्यानंतर वाधवान बंधूंसह 21 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. या सर्वांना 14 दिवसांच्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांचा क्वारंटाइनचा कालावधी संपल्यानंतर त्यांना महाबळेश्वर येथे नेण्यात आले. या सर्वांना महाबळेश्वर येथील बंगल्यावर होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे वाधवान बंधूंना अंमलबजावणी संचनालय (ईडी) आणि सीबीआयने ताब्यात घ्यावे,असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, वाधवान बंधूंचा 14 दिवसांचा इन्स्टि्यूशनल क्वारंटाइनचा कालावधी बुधवारी दुपारी 12 वाजता समाप्त झाला. त्यांना ताब्यात घेण्यात यावे, असे सीबीआय आणि ईडीला सांगितले आहे. वाधवान बंधूंना सीबीआय किंवा ईडी ताब्यात घेत नाही तोपर्यंत ते राज्य सरकारच्या ताब्यात राहतील. कोणालाही लंडनला जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. सीबीआयने वाधवान बंधूंचा ताबा मागितल्यास त्यांच्या हवाले करण्यात येईल.

खंडाळा ते महाबळेश्वर

कपील आणि धीरज वाधवान बंधू यांनी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचे उघड झाल्यानंतर त्यांच्यावर 144 कलमानुसार महाबळेश्वर पोलिसांनी कारवाई केली. हे वाधवान बंधू आपल्या 5 अलिशान कारमधून 23 जणांना घेऊन मुंबईहून महाबळेश्वरला गेले होते. या प्रवासासाठी त्यांनी थेट गृहमंत्रालयातून पत्र मिळाले होते. यामुळे वाद निर्माण झाला असून ही परवानगी कुणी दिली याची चौकशी करण्यात येणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, गृहमंत्रालयाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या लेटरहेडवर वाहतुकीच्या परवानगीचे पत्र देण्यात आले होते. यावर 8 एप्रिल अशी तारीख आहे. यानंतर बेलवर असणाऱ्या वाधवान यांना कसा पास प्रवास पास मिळतो या संदर्भात चौकशी करावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली आहे.